प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी कर्ज मेळावा आयोजित करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दिले आहेत. मुंबईत राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला राज्यातील सर्व मंत्री, सरकारी अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच कृषिक्षेत्रात दुपटीने प्रगती झाल्याचा उल्लेख करत कृषी, मार्केटिंग, सहकार क्षेत्राचे अभिनंदन केले. शेतकऱ्यांना कर्ज मिळावे, यासाठी राज्यातील सर्व मंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कर्ज मेळावे आयोजित करावेत, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. त्याच्या नियोजनाची सर्व माहिती जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात यावी, असेही ते म्हणाले. पीक नियोजनाबाबत कृषी विद्यापीठे आणि इतर विभागांनी एकत्रितपणे अभ्यास करावा, तसेच शेतकऱ्यांना वेळोवेळी शेती आणि घेण्यात येणाऱ्या पिकांबाबत मार्गदर्शन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. पीक उत्पादनात वाढ करण्याचे यावर्षीचे लक्ष्य आहे. त्यानुसार सर्व जिल्ह्यांत मोहीम हाती घेण्यात यावी. त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. समूहशेतीवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. दोन महिन्यांत जलयुक्त शिवार, शेततळी, विहिर योजनेची कामे पूर्ण करा. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने कामे झाली पाहिजेत, असेही ते म्हणाले. कृषी आणि पणन विभागाने स्टोरेज आणि फूड प्रोसेसिंगसाठी अधिकाधिक कामे केली पाहिजेत. शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव मिळण्यासाठी या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असेही ते म्हणाले. यंदा पाऊस चांगला व्हावा, अशी मी प्रार्थना करतो. पण दुष्काळी परिस्थिती उद्भवलीच तर त्याला तोंड देण्यासाठी आतापासूनच आराखडा तयार करण्यात यावा. संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.