पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने पाण्याबरोबरच विजेचेही संकट उभे राहिले आहे. राज्यात विजेची मागणी १६ हजार ५०० मेगावॉटपर्यंत गेली असून उपलब्धता कमी असल्याने एक ते दीड हजार मेगावॉटचे विजेचे अघोषित भारनियमन राज्यात मंगळवारीही करण्यात आले. राज्यात वीजटंचाई नसल्याचे दावे केले जात असताना सर्व गटांतील वीजग्राहकांना काही तासांचे भारनियमन सोसावे लागत आहे.
पाऊस पडत नसल्याने कृषीपंपांचा वीजवापर वाढला आहे आणि अन्य ग्राहकांकडूनही विजेचा वापर वाढल्याने विजेची कमाल मागणी १६ हजार ५०० मेगावॉटपर्यंत पोचली आहे. तर राज्यात सध्या विजेची उपलब्धता १५ हजार ते १५ हजार ५०० मेगावॉटपर्यंत आहे. त्यामुळे एक ते दीड हजार मेगावॉटचे अघोषित भारनियमन राज्यात सोमवारपासून सुरू आहे. महानिर्मितीचा चंद्रपूरमधील ५०० मेगावॉटचा एक संच सुरू झाल्याने महानिर्मितीकडून ४०५५ मेगावॉट वीज मिळू शकत आहे. पाण्याअभावी परळी येथील ११३० मेगावॉट वीजनिर्मिती बंद आहे. पवन ऊर्जेतूनही दोन हजार मेगावॉटऐवजी ५०० ते ६०० मेगावॉट वीज मिळत आहे. कोयना प्रकल्पातील २५० मेगावॉट क्षमतेचा एक संच बंद असून अदानी पॉवरचा ६६० मेगावॉट क्षमतेचा एक संचही बंद आहे. या समस्येवर मात करण्यासाठी महावितरणने एक हजार ते १२०० मेगावॉट वीज काही तासांसाठी विकत घेतली. तरीही भारनियमन करावे लागत असून ही परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.