उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केल्यानंतरही गुरूवारी संप मागे घेण्यास राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी नकार दिला आहे. नातेवाईकांकडून होणाऱ्या मारहाणीच्या कारणावरून गेले पाच दिवस डॉक्टरांचा संप सुरू आहे. राज्य सरकारकडून लिखित आणि ठोस आश्वासन मिळाले नसल्याचे कारण पुढे करीत डॉक्टरांनी गुरूवारीही कामबंद आंदोलन सुरुच ठेवले. त्यातच  इंडियन मेडिकल असोसिएशन(आयएमए), असोसिएट ऑफ मेडिकल कन्सलटंट (एएमसी), मेडिकल टिचर्स असोसिएशन यांनीही पाठिंबा दिल्याने संपाला बळकटी मिळाली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यभरात सरकारी किंवा पालिका रूग्णालयातीलच नव्हे तर खासगी वैद्यकीय सेवेवरही संपाचा विपरित परिणाम झाला. या आंदोलनात १ लाखाहून अधिक डॉक्टर सहभागी झाल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे.

गेल्या तीन वर्षांत ५३ डॉक्टरांवर हल्ले करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी गेली अनेक वर्षे राज्य सरकारकडून फक्त आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे यंदा सरकारने लेखी आश्नासन द्यावे अशी मागणी डॉक्टरांकडून केली जात आहे. गेले पाच दिवस पालिकेच्या रुग्णालयाचे बाह्य़विभाग बंद असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला. न्यायालयाच्या आदेशानंतरही रुग्णालयात रुजू न होणाऱ्या निवासी डॉक्टरांना त्या त्या रुग्णालयातील व्यवस्थापनाकडून नोटीस बजावण्यात आल्यान आहेत. अनेक निवासी डॉक्टरांना वसतिगृह रिकामी करण्यासंदर्भातही नोटीस बजावण्यात आली आहे. या आंदोलनाला म्युनिसिपल मजदूर युनियन या संघटनेनेही पाठिंबा दर्शविला आहे. डॉक्टरांबरोबर परिचारिका व रुग्णालय कर्मचाऱ्यांनाही पालिका रुग्णालयात त्रास सहन करावा लागत आहे.

रुग्णालयाची नातेवाइकांकडून तोडफोड

औरंगाबाद : उपचारानंतरही सात महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचा राग असल्याने कन्नड येथील लक्ष्मी हॉस्पिटलवर १० ते १२ जणांनी गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास हल्ला करून तोडफोड केली. सात महिन्यांच्या अमीन सबीज बेग या मुलीच्या डोक्याला मार लागला होता. दोन दिवसांपूर्वी तिच्यावर लक्ष्मी हॉस्पिटलमध्ये उपचार केले होते. अचानक तिची प्रकृती बिघडल्यामुळे आज तिला औरंगाबाद येथे हलविण्यात आले. मात्र, प्रवासादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेचे वृत्त कन्नडमध्ये नातेवाइकांना कळाल्यानंतर त्यांनी रुग्णालय व सोबतच्या औषधी दुकानाची तोडफोड केली. या प्रकरणी कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.