केंद्र शासनाच्या प्रस्तावित रस्ते वाहतूक व सुरक्षा विधेयकास विरोध म्हणून आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी संपातून महाराष्ट्रातील वाहतूकदारांनी माघार घेतल्याचे जाहीर केले. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर महाराष्ट्रातील वाहतूकदार संघटनांनी हा निर्णय घेतला. तत्पूर्वी गुरूवारी सकाळपासूनच या एकदिवसीय बंदला मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरी भागांमध्ये तितकासा प्रतिसाद मिळताना दिसत नव्हता. याठिकाणी वाहतुकीची सर्व साधने सुरळीत सुरू होती. याशिवाय, बेस्टच्या संचालकांनी बुधवारीच सर्व कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याची सक्त ताकीद दिली होती. त्यामुळे बससेवा नेहमीप्रमाणे सुरू होती. त्यामुळे मुंबईकरांना गैरसोयीला सामोरे जावे लागेल, ही भीती फोल ठरली.
ठाणे शहरामध्ये बस आणि रिक्षाचालक दोघेही या संपात सहभागी झाले नव्हते. त्यामुळे तेथील वाहतुकही सुरळीत होती. मात्र, पुण्यातील रिक्षाचालकांनी या संपात मोठ्या प्रमाणावर सहभागी होत रिक्षा बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे पुणेकरांना थोड्याशा त्रासाला सामोरे जावे लागले. पुणेकरांसाठी पीएमपीएलची बससेवा सुरू होती तरी सर्व कर्मचारी दंडाला काळ्या फिती लावून काम करत होते.
नाशिक,नांदेड आणि धुळे भागात काही प्रमाणात या बंदचा चांगलाच परिणाम पहायला मिळाला. बंदमुळे या भागातील एसटी आणि बससेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. नाशिकमध्ये एसटी चालकांनी बसेस आडव्या लावून डेपोमध्ये येण्याचा रस्ता रोखून धरला होता. त्यामुळे येथील लोकांना खासगी वाहनधारकांनी नाकीनऊ आणले होते. तर सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद आणि बीडमध्ये मात्र बस आणि एसटी सेवा व्यवस्थित सुरू होती. कोल्हापूरातील कोणतीही संघटना या बंदमध्ये सहभागी झाली नसल्याने एसटी आणि सिटी या दोन्ही बससेवा नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे चालत होत्या. कोकणातील रत्नागिरीतही वाहतूकदारांच्या बंदचा कोणताही परिणाम दिसत नव्हता. याठिकाणी रिक्षा आणि एसटी सेवा व्यवस्थित सुरू होती.