शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी राज्य सरकारकडे एका महिन्याचे मानधन जमा करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आज भाजपनेही सर्व मंत्री आणि आमदार आपलं एका महिन्याचं मानधन शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडे जमा करणार असल्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर ही महत्त्वाची माहिती दिली.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी राज्य सरकारकडे एका महिन्याचं मानधन जमा करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी हा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी भाजपचे मंत्री आणि आमदार आपलं एका महिन्याचं मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार असल्याचे जाहीर केले आहे.

दुष्काळात होरपळलेला शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी राज्य सरकारनं निधी उभारण्याचा निर्धार केला आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचं एका दिवसाचं वेतन द्यावं, असं आवाहन राज्य सरकारनं केलं होतं. राज्य सरकारी, निमसरकारी, महामंडळांतील अधिकारी आणि कर्मचारी तसेच प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी आपल्या जुलैच्या वेतनातून एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्यावं, असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. यासंबंधी सरकारनं परिपत्रक काढलं होतं. ही मदत ऐच्छिक असल्याचंही त्यात स्पष्ट केलं होतं. मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, आमदार आणि पोलीस दलातील अधिकाऱ्यांनीही आपलं एका दिवसाचं वेतन शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी द्यावं, असं आवाहनही करण्यात आलं होतं. अर्थात ही मदत सक्तीची नसून ऐच्छिक आहे, असं सामान्य प्रशासन विभागानं स्पष्ट केलं होतं.