ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे वाढवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या पंतप्रधान ग्रामसडक योजना-२ अंतर्गत महाराष्ट्राचे ८२९ किलोमीटर लांबीचे आणि ४८९ कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प केंद्र सरकारने मंजूर केले आहेत.
यामध्ये सर्वाधिक १२६ किलोमीटर लांबीचे प्रकल्प सोलापूर जिल्ह्यातील तर ८८ किलोमीटर लांबीचे प्रकल्प पुणे जिल्ह्यातील आहेत. तिसरा क्रमांक लातूरमधील प्रकल्पांचा आहे.
पंतप्रधान ग्रामसडक योजना-२ अंतर्गत रस्ते बांधणीसाठी ७५ टक्के रक्कम केंद्र सरकार देते तर २५ टक्के खर्च राज्य सरकारला उचलायचा आहे. शुक्रवारी दिल्लीत झालेल्या अधिकारप्राप्त समितीच्या बैठकीत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ८२९ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यास मंजुरी देण्यात आली. तर १५५० किलोमीटर लांबीच्या महाराष्ट्राच्या आणखी एका प्रस्तावावर जानेवारी २०१४ मधील बैठकीत निर्णय होणार आहे. शुक्रवारी मंजूर झालेल्या प्रकल्पांमध्ये सोलापूर आणि पुण्यापाठोपाठ लातूर जिल्ह्यातील ७१ किलोमीटर लांबीचे रस्ते आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ५३ किलोमीटर लांबीचे रस्ते मंजूर झाले. एकूण ८२९ किलोमीटर लांबीच्या ११८ रस्त्यांच्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली.