वीज कोसळून मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना मंगळवारी राज्य सरकारकडून चार लाखांची मदत जाहीर करण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयाबद्दल मदत आणि पुनवर्सनमंत्री एकनाथ खडसे यांनी माहिती दिली. यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील ६९ जणांचा वीज पडून मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांतील वादळी पावसाने ५० वीजबळी घेतले होते. आतापर्यंतच्या शासकीय धोरणानुसार वीजबळीच्या नातेवाईकांना एक लाखांची मदत देण्यात येत होती. मात्र, आता ही मर्यादा वाढवून आता चार लाखांपर्यंत करण्यात आली आहे. तसेच मृत व्यक्तीचा शवविच्छेदन अहवाल सादर करण्यात आल्यानंतर २४ तासांच्या आत मृतांच्या नातेवाईकांना ही मदत देण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आल्याचे एकनाथ खडसेंनी सांगितले. याशिवाय, वीज पडून जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांनाही मदत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बैलासारख्या मोठ्या जनावरांसाठी ३० हजार रूपये, गाढव-उंटासाठी १५ हजार रूपये आणि शेळ्या-मेंढ्यासाठी साडेतीन हजार रूपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे.