मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने आज मुंबईतील दादरच्या चौपाटीवरील चैत्यभूमीला ‘अ’ श्रेणी प्रार्थनास्थळ आणि पर्यटनस्थळाचा दर्जा दिला. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असलेल्या चैत्यभूमीला ‘अ’ श्रेणी प्रार्थनास्थळ आणि पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या निर्णयाने या मागणीला यश आले आहे.

चैत्यभूमीला अ श्रेणी प्रार्थनास्थळाचा दर्जा देण्याबाबतच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, शुक्रवारी मान्यता दिली असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो.

अलिकडेच राज्य सरकारने नागपूर येथील दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणी प्रार्थनास्थळ आणि पर्यटनस्थळाचा दर्जा दिला होता. १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो दलितांना आमंत्रित करून याच ठिकाणी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. विशेष बाब म्हणजे गेल्या महिन्यात राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने चैत्यभूमीजवळील इंदू मीलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे बांधकाम सुरू करण्यास राज्य सरकारला परवानगी दिली होती.