भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काही काळ वास्तव्य केलेले लंडनमधील घर खरेदी करून ते आंतराष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला.  
बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणासाठी लंडनमध्ये गेले असता, १९२१-२२ या कालावधीत १० किंग्ज हेन्री रोड, एनडब्लू ३ या घरात त्यांचे वास्तव्य होते. या कालावधीत त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या जगातील नामांकित संस्थेमधून डीएससी इन इकॉनॉमिक्स ही पदवी प्राप्त केली. त्याचबरोबर ग्रेझ इन या संस्थेमधून ‘बार अ‍ॅट लॉ’ ही पदवी संपादित केली. त्याशिवाय लंडनमधील याच वास्तव्याच्या काळात त्यांनी विविध विषयांवर महत्त्वपूर्ण संशोधन केले.
बाबासाहेबांसारख्या महापुरुषाच्या ऐतिहासिक वास्तव्याच्या आठवणी लंडनमधील त्या घराशी जुळल्या आहेत. त्यामुळे ही वास्तू खरेदी करण्याचा व तिचे आंतराष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. घर खरेदीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सामाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात सामाजिक न्याय खात्याचे राज्य मंत्री, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव यांचा समावेश आहे. घर खरेदीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
नुकसानभरपाईत  वाढ
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे होणारे शेती आणि फळपिकांचे नुकसान लक्षात घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाने घेतला. यापुढे नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडलेली व्यक्ती कुटुंबातील कर्ता असल्यास त्याच्या वारसांना अडीच लाख रुपयांची तर इतर व्यक्तींच्या वारसास दीड लाख रुपयांची मदत दिली जाईल. मृत जनावरांच्या मालकांना एका मोठ्या जनावरासाठी २५ हजार, दोन मध्यम जनावरांसाठी प्रत्येकी १० हजार, दोन लहान जनावरांसाठी प्रत्येकी पाच हजार  चार लहान जनावरांसाठी प्रत्येकी साडेतीन हजार रूपये या प्रमाणात मदत देण्यात येईल. पूर्णत: उध्वस्त झालेल्या पक्क्या घरासाठी ७० हजार, पूर्णत: उध्वस्त झालेल्या कच्च्या घरासाठी २५ हजार, किमान १५ टक्के नुकसान झालेल्या घरांसाठी १५ हजार रूपये मदत देण्यात येणार आहे.
कोरडवाहू शेतीपिकांसाठी प्रति हेक्टर दहा हजार, आश्वासित सिंचन क्षेत्राखाली पिकांसाठी हेक्टरी १५ हजार, बहुवार्षकि पिकांसाठी हेक्टरी २५ हजार रूपये मदत देण्यात येईल. तसेच खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी २० हजार रूपये, वाहून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी २५ हजार रूपये मदत देण्यात येणार आहे. अन्य योजना कायम ठेवण्यात येतील.