उल्हासनगर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने प्रशासनाच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करून नाममात्र दराने स्वयंसेवी संस्थेला भूखंड उपलब्ध करून देण्याचा मंजूर केलेला ठराव राज्य शासनाने रद्दबातल ठरविला आहे.
उल्हासनगर शहरातील साधू वासवानी उद्यानातील जागा रोटरी मिडटाऊन या संस्थेला एक रुपये वार्षिक नाममात्र भाडय़ाने देण्याचा ठराव उल्हासनगर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ऑगस्ट २०१४ मध्ये करण्यात आला होता. पालिका प्रशासनाने मात्र मासिक ९३ हजार रुपये भाडे आकारण्याचा प्रस्ताव सादर केला होता. प्रशासनाच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करून महासभेने सुधारणा सुचविली होती. एक रुपये नाममात्र दराने भूखंड देण्याच्या निर्णयामुळे महापालिकेचे वार्षिक सुमारे १२ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान होणार होते. यामुळेच हा ठराव रद्द करण्याची शिफारस महापालिका आयुक्तांनी राज्य शासनाला केली होती. या शिफारसीनुसार मुख्यमंत्र्यांकडील नगरविकास विभागाने नाममात्र एक रुपया दराने भाडेतत्त्वावर भूखंड देण्याचा उल्हासनगर पालिकेने घेतलेला निर्णय रद्दबातल ठरविला आहे.