अर्थसंकल्प सादर करत असताना विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या १९ आमदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे सुतोवाच संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी केले होते. सलग तीन दिवसाच्या सुट्टीनंतर आज विधीमंडळाचे अधिवेशन होत आहे  या पार्श्वभूमीवर सरकारकडून आमदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात १२ आमदारांचे व दुस-या टप्प्यात ७ आमदारांचे निलंबन रद्द करण्यात येणार असल्याचे समजते.त्यामुळे सरकार किती आमदारांचे निलंबन मागे घेते याकडे विरोधी पक्षांचेही लक्ष वेधले आहे. आज ११ वाजता विधानसभेचे कामकाज सुरु होणार आहे. त्यामुळे सरकारकडून निलंबन रद्द करण्याचा प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे.

शेतक-यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे या मागणीसाठी विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधक आक्रमक झाले आहेत. अर्थसंकल्प सादर होत असताना विरोधकांनी घोषणाबाजी केली होती. सभागृहात गोंधळ घालणे, बॅनर फडकावणे, घोषणाबाजी करणे, अवमान करणे, अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे, सभागृहाची प्रतिमा मलिन करणे, सभागृहाचे अवमान करणे  असे आरोप ठेवून  काँग्रेस- राष्ट्रवादीच्या १९ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. यामध्ये संग्राम थोपटे, अब्दुल सत्तार, अमर कल्ले, दत्ता भरणे, भास्कर जाधव ,जितेंद्र आव्हाड , विजय वडेट्टीवार, वैभव जगताप, अवधूत तटकरे, हर्षवर्धन सकपाळ, मधुसूदन केंद्रे, कुणाल पाटील, जयकुमार गोरे, अमर काळे, दीपक चव्हाण, डी.पी. सावंत, राहुल जगताप, अमित झनक आणि राहुल बोंद्रे यांचा समावेश आहे.

[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]