महाराष्ट्रात सोमवारी स्वाईन फ्लूने आणखी नऊ जणांचा बळी घेतल्याने, या आजाराला रोखण्यासाठीचे राज्यातील आरोग्ययंत्रणांचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसून आले. तत्पूर्वी रविवारी स्वाईन फ्लूने १२ जणांचा मृत्यू झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांत मृतांची संख्या २१वर पोहचली आहे. तर आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण १५२ जणांचा स्वाईन फ्लुने मृत्यू झाला आहे.
राज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सर्व रुग्णालयांना स्वाइन फ्लूच्या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्याचे आवाहन केले होते. स्वाइन फ्लू रोखण्यासाठी आणि तो आजार झालेल्या रुग्णांना तातडीने उपचार मिळावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. याचाच एक भाग म्हणून मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे आणि नागपूर येथील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी लातूर भागात ती वाढत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले होते. यातच अवकाळी पावसामुळे या आजाराचे विषाणू अधिक फैलावण्याची शक्यता आहे. यामुळे पुढचे १५ दिवस आमच्यासाठी खूप आव्हानाचे असतील, असेही ते म्हणाले. मुख्य सचिव आणि आरोग्यमंत्री जातीने परिस्थितीचा आढावा घेत आहेत. स्वाइन फ्लूबाबत जागरुकता मोहीम हाती घेण्याचा आमचा विचार असल्याचेही फडणवीसांनी ट्विटरवर नमूद केले.
दरम्यान, राज्यातील सद्य:स्थितीला सरकार जबाबदार असून आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी केली होती. राज्यात स्वाइन फ्लूमुळे अनेक बळी जात आहेत. त्यावरील औषधे सामान्यांना परवडतील अशा दरात उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्यमंत्री काहीच करताना दिसत नसल्याचा आरोपही पाटील यांनी केला होता. स्वाइन फ्लूचा फैलाव होऊन इतके दिवस उलटून गेले तरी वृत्तपत्रांमध्ये किंवा दूरचित्रवाणीवर आजाराबाबत जागृती करणारी जाहिरात सरकारने दिलेली नाही. अजून किती जणांचा बळी घेण्याची सरकारची इच्छा आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर हल्ला चढवला होता.
****
देशात ३४ बळी
स्वाइन फ्लूने देशात आणखी ३४ बळी घेतले असून मृतांची संख्या १०७५ झाली आहे, तर एच१ एन१ विषाणूचा संसर्ग १९ हजार लोकांना झाला आहे.
****
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, स्वाइन फ्लूचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १०४१ आहे. संसर्ग झालेल्यांची संख्या २० हजारांच्या पुढे गेली आहे.