राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये असलेले कुपोषण कमी करण्यासाठी राज्यभरातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात आता अंडय़ांचा समावेश केला जाणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ९ ऑक्टोबर हा दिवस राज्यात जागतिक अंडी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.
राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त विश्वास भोसले यांनी या संदर्भात राज्याच्या शिक्षण विभागाचे आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांना पत्र पाठविले असून त्यात ही सूचना केली आहे.
अंडय़ामध्ये शरीराची जडणघडण करणार प्रथिने, नऊ अत्यावश्यक अमिनो अ‍ॅसीड्स, जीवनसत्वे, खनिजे, ऊर्जा आहे. राज्यातील शाळांमध्ये माध्यान्ह पोषण आहारात आठवडय़ातून एकदा मुलांना पुरक आहार दिला जातो. केंद्र आणि राज्य शासनाच्या कुक्कुटपालन योजना पशुसंवर्धन विभाग राबवित असून ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना ताजी अंडी मिळू शकतील, असेही या पत्रात म्हटले आहे.
राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने याबाबतचे पत्र राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविले आहे. तसेच पोषण आहारात अंडय़ांचा समावेश करण्याच्या आणि ९ ऑक्टोबर हा दिवस जागतिक अंडी दिन म्हणून साजरा करण्याच्या सूचनाही यात देण्यात आल्या आहेत.

सगळ्यांना अंडी देण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. पण अंडय़ांबरोबरच मुलांना आठवडय़ातून एकदा दूध ही दिले जावे. म्हणजे जी मुले अंडी खात नाहीत, त्यांना आहारात याचा लाभ होईल.
-प्रशांत रेडीज,प्रवक्ते राज्य मुख्याध्यापक महासंघ