ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांची टीका झोंबल्यानंतर वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांनी नेमाडे यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद टीप्पणीचे पडसाद थेट राज्य शासनाच्या दरबारातही उमटले आहेत. रश्दी यांच्या अनुद्गारांची चौकशी करण्याचे निर्देश गृह विभागाला देण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.
डॉ. नेमाडे यांना ज्ञानपीठ जाहीर झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतींमध्ये रश्दी यांच्या लेखनावर नेमाडे यांनी टीका केली होती. पाठोपाठ रश्दी यांनी असंसदीय भाषेत नेमाडे यांच्या टीकेला दिलेल्या उत्तरामुळे मराठी साहित्यसृष्टीत तीव्र नापसंतीही व्यक्त झाली. रश्दी आणि नेमाडे यांच्यातील वाद नवा नसला तरी रश्दी यांनी वापरलेले शब्द अपमानास्पद व असंस्कृत असल्याची भावना साहित्यविश्वात व्यक्त झाली होती.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत डॉ. नेमाडे यांचे ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल अभिनंदन करणारा प्रस्ताव संमत करण्यात आला. या पाश्र्वभूमीवर, नेमाडे यांच्यावरील रश्दी यांच्या असंस्कृत टिप्पणीची दखल सरकारने घेतली आहे का, याबाबत विनोद तावडे यांना विचारणा केली असता, गृह खात्याने या प्रकरणी लक्ष घातले आहे, असे ते म्हणाले.
डॉ. नेमाडे यांना पुरस्कार देणे योग्य की अयोग्य, यावर भाष्य करण्याचा अधिकार रश्दी यांना आहे. पण त्यांनी डॉ. नेमाडे यांच्याबाबत जी भाषा वापरली आहे, ती अत्यंत आक्षेपार्ह व चुकीची आहे, असे तावडे यांनी स्पष्ट केले.