युती सरकारमधील काही मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळतानाच महिला व बालविकास, शिक्षण, कृषी, आरोग्य, आदिवासी या विभागांमार्फत गेल्या १५ वर्षांमध्ये झालेल्या विविध वस्तूंच्या खरेदी व्यवहारांची मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत चौकशी करण्याची घोषणा करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात ढकलण्याचा प्रयत्न केला. भ्रष्ट मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांच्या भाषणात व्यत्यय आणत प्रचंड गोंधळ घातला.
विधान परिषदेत गुरुवारी विरोधी पक्षांच्या वतीने महिला व बालविकास, शिक्षण, आरोग्य, आदिवासी व कृषी विभागांमार्फत झालेल्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणारा प्रस्ताव चर्चेसाठी मांडला होता. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांना टीकेचे लक्ष्य केले होते. या खात्याच्या वतीने खरेदी करण्यात आलेली चिक्की, जेवणाची ताटे, जलशुद्धीकरण यंत्रे, अंगणवाडय़ांमधील मुलांची वजने करण्यासाठीची यंत्रे, चटया यांत २०६ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. महिला-बालकल्याण विभागाच्या वतीने केलेल्या खरेदीत एक रुपयाचाही गैरव्यवहार झालेल्या नाही, खोटे आरोप केले जात आहेत, असा दावा या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंकजा मुंडे यांनी केला. कृषिमंत्री एकनाथ खडसे, सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले.
विरोधी पक्षांच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी शेवटी चर्चेला उत्तर दिले. ‘खोदा पहाड और निकला चुहा’ अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या सरकारमधील मंत्र्यांवर आरोप करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेतला. कृषी विभागाच्या चारा यंत्रांच्या ३-४ कोटी रुपयांच्या खरेदीचा १२५ कोटी रुपये कसा आकडा केला, असा प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला. शिक्षण विभागाने १९१ कोटी रुपयांची अग्निशमन यंत्रांची खरेदीच केली नाही, त्यामुळे त्याबाबत आरोप करताना जरा नीट अभ्यास केला असता तर बरे झाले असते, असा टोला विरोधकांना हाणला.
चिक्की व अन्य खरेदीत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडे यांची जोरदार पाठराखण केली.  ई-निविदा पद्धतीने खरेदी करण्याचा नियम असला तरी, दरकराराप्रमाणे खरेदी करण्यास मनाई नाही, या संदर्भात आधीच्या सरकारनेच शासन आदेश काढून स्पष्टीकरण दिलेले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. विरोधकांनी प्रचंड गोंधळ घालत मुख्यमत्र्यांच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.

राणेंच्या ‘उद्योगा’वर निशाणा
आपल्या मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आधीच्या सरकारमधील उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. उद्योग सचिवांनी एकाच संस्थेकडून चिक्की व पौष्टिक आहार खरेदी करणे योग्य नाही, असा आक्षेप नोंदवला असतानाही तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सूर्यकांता या एकाच संस्थेकडून खरेदी करण्याचा आदेश दिला होता, असा आरोप करीत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.