परिवहन विभागाच्या कार्यालयात दलालांवर र्निबध घातल्याने वादग्रस्त ठरलेल्या आयुक्त महेश झगडे यांना हटविण्यात आले असून, त्यांची नियुक्ती पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणावर करण्यात आली आहे. झगडे यांची आठ महिन्यांतच बदली झाली असून, खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्येही राजकीय हस्तक्षेपाची दखल घेतली नसल्याने त्यांना फटका बसल्याचे समजते. परिवहन आयुक्तपदी सोनिया सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने १७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
वाहन परवान्यासह अन्य कामे करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या कार्यालयांमध्ये दलालांचा सुळसुळाट असतो. त्यांच्यामार्फत गेल्यासच वेगाने कामे होतात, अन्यथा रखडपट्टी होते, असा सर्वसामान्यांचा अनुभव आहे. हे रोखण्यासाठी झगडे यांनी दलालांना कार्यालयात प्रवेश बंदी केली होती. भ्रष्टाचाराचे मार्ग रोखले गेल्याने त्याला जोरदार विरोध झाला होता. झगडे यांची बदली करण्यासाठी दबाव वाढत गेल्याने आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याशीही त्यांचे ‘सूर’ न जुळल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बदलीचे निर्देश दिले.
त्याचबरोबर सरकारने आणखी १६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. पुणे िपपरी- चिंचवड वाहतूक प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अभिषेक कृष्णा, तर एमआयडीसीच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विक्रम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून रायगडला शीतल उगले, नागपूरला सचिन कुर्वे, यवतमाळला सचिंद्र प्रताप सिंग, परभणी येथे आर. आर. महिवाल, औरंगाबाद येथे वीरेंद्र सिंग, भंडारा येथे धीरजकुमार, अकोला येथे जी. श्रीकांत, नांदेड येथे सुरेश काकाणी, वर्धा येथे निरुपमा डांगे यांची नियुक्ती जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. नागपूर येथे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून नवीन सोना, तर अतिरिक्त आदिवासी विकास आयुक्तपदी माधवी खोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुपिंदरसिंग यांची ‘मेडा’च्या महासंचालकपदी, तर अमिताभ जोशी यांची राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे.