पनवेल महापालिका स्थापनेची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली असून, १ ऑक्टोबरपासून पनवेल महापालिका अस्तित्त्वात येणार आहे. नगरविकास आणि ग्रामविकास विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे पनवेल महापालिकेच्या स्थापनेचा खेळखंडोबा गेल्या तीन महिन्यांपासून कायम होता. अखेर अधिसूचना काढत सरकारने या प्रश्नी मार्ग काढला आहे.
या महापालिकेत जाण्यात शेकाप आणि राष्ट्रवादीच्या ताब्यातील ग्रामपंचायतींनी विरोध सुरू केला असून, खारघर ग्रामपंचायतीने तर महापालिका स्थापनेच्या सरकारच्या अधिकारालाच उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यातच महापालिकेत समाविष्ट करण्यात येणाऱ्या ३२ गावांमधील ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यांचे अस्तित्व संपुष्टात आणण्याची प्रक्रियाच ग्रामविकास विभागाने पूर्ण केलेली नसल्याने महापालिकेच्या स्थापनेची अंतिम अधिसूचना निघू शकलेली नव्हती. नगरविकास विभागाने अंतिम अधिसूचनेची संपूर्ण तयारीही केली होती. मात्र ग्रामविकास आणि नगरविकास विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ही अधिसूचना लांबणीवर पडली होती.