दुष्काळप्रश्नी शिवसेना आक्रमक झाली असून हिवाळी अधिवेशनापूर्वी शेतकऱ्यांना तातडीने मदत न दिल्यास सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आहे. केवळ कागदी घोडे न नाचविता केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने आता केंद्राकडून २५ हजार कोटी रुपयांची मदत मिळवून दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा द्यावा आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २४ व २५ नोव्हेंबर रोजी मराठवाडा दौऱ्यावर असून सर्व शिवसेना आमदार त्यांच्याबरोबर जनतेची व्यथा समजून घेणार आहेत. शिवसेनेचे सर्व खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आणि संसदेतही दुष्काळप्रश्नी मदतीची मागणी करणार असल्याचे गजानन कीर्तीकर यांनी सांगितले.
मराठवाडय़ात गंभीर दुष्काळ असून त्यावरुन सरकारला सळो की पळो करण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ िशदे, रामदास कदम, दिवाकर रावते, विजय शिवतरे आदी शिवसेना नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी भेट घेतली. शेतकऱ्यांना तातडीने एकरी १० हजार रुपयांची अंतरिम मदत देण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. केंद्र सरकारचे निरीक्षक पाहणीसाठी येतील आणि त्यांच्या अहवालानंतर केंद्र सरकार निर्णय घेईल, अशी ठोकळेबाज उत्तरे मुख्यमंत्री फडणवीस यांनी देऊ नयेत.

मराठवाडय़ाला पाणी द्या !
मराठवाडय़ाच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी मिळालेच पाहिजे, अशी भूमिका मांडत जायकवाडी धरणात नाशिक पट्टय़ातील धरणांमधून पाणी सोडण्याची मागणी शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अन्य भागातील नेत्यांच्या राजकीय दादागिरीमुळे मराठवाडा कायम दुष्काळग्रस्त राहिला, असे मत त्यांनी व्यक्त केले.