महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल आज जाहीर झाला. बारावीच्या यंदाच्या निकालांमध्येही मुलींनीच बाजी मारली. शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत परीक्षेच्या निकालाची विभागवार माहिती देण्यात आली. त्यानुसार बारावीच्या परीक्षेत एकुण ८९.५० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांमध्ये मुलांची संख्या ८६.६५ टक्के तर मुलींची संख्या ९३.०५ टक्के इतकी आहे. तर विभागनिहाय विचार करायचा झाल्यास कोकणातून सर्वाधिक ९५.२० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालात मागील वर्षीच्या तुलनेत २ टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली.  विद्यार्थ्यांना हे निकाल दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन पाहता येणार आहेत. तर ९ जूनला विद्यार्थ्यांना आपापल्या महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिका मिळतील. सकाळी ११ वाजता गुणपत्रिका महाविद्यालयात पोहचवण्यात येतील. त्यानंतर तीन वाजल्यापासून विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप होईल. तर ३१ मे ते ९ जून या कालावधीत विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्ससाठी विद्यार्थ्यांना ४०० रुपयांचे शुल्क द्यावे लागेल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी – मार्च २०१७ मध्ये पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहेत. दुपारी १ पासून निकाल ऑनलाइन पाहता येणार आहेत. तसेच मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ते पाहता येणार आहेत.

या वेबसाइटवर पाहता येईल निकाल
http://www.mahresult.nic.in
http://www.result.mkcl.org
http://www.maharashtraeducation.com
http://www.knowyourresult.com/
http://www.rediff.com/exams

या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादीत केलेले गुण पाहता येथील. तसेच त्याची प्रत (प्रिंट आऊट) घेता येणार आहे.

मोबाइल एसएमएसद्वारेही निकाल जाणून घ्या

बीएसएनएल ग्राहकांनी ५७७६६ या क्रमांकावर MHHSC टाईप करा. स्पेस द्या. त्यानंतर आसन क्रमांक टाकावे आणि ५७७६६ या क्रमांकावर एसएमएस पाठवा.
दरम्यान, बारावी निकालाबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अफवांचे पीक आले होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात गोंधळाचे वातावरण होते. मात्र, आता बोर्डाने निकालाची तारीख जाहीर केल्याने विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे. २८ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी सुमारे १५ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

राज्याचा विभागनिहाय निकाल
कोकण – ९५.२०%
कोल्हापूर – ९१.४०%
पुणे – ९१.१६%
औरंगाबाद – ८९.८३%
अमरावती – ८९.१२%
नागपूर – ८९.०५%
लातूर – ८८.२२%
नाशिक – ८८.२२%
मुंबई – ८८.२१%

कोणत्या शाखेचा किती निकाल?
विज्ञान – ९५.८५%
कला – ८१.९१%
वाणिज्य – ९०.५७%