राज्याच्या प्रमुखपदावरील नेत्याकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा असते. विरोधकांबाबत त्यांनी संयम ठेवून बोलावे, चुकीचे वक्तव्ये करू नयेत अशी अपेक्षा असते. देवेंद्र फडणवीस हे विरोधक म्हणून आक्रमक आणि अभ्यासपूर्ण मांडणी करीत असत. परंतु आता नव्या भूमिकेत त्यांच्यामध्ये अधिक परिपक्वता येण्याची गरज आहे, अशा शेलक्या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना कानपिचक्या दिल्या. 

लोकसत्तासाठी खास लिहिलेल्या आणि राज्यापुढील विविध प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या विशेष लेखामधून पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपल्या खास शैलीत टीका केली. नागपूर अधिवेशनानंतरच्या वार्ताहर परिषदेत ‘विरोधकांना लाज वाटायला हवी’ असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केल्याचे आपल्या वाचनात आले. त्यात तथ्य असेल, तर ते धक्कादायक आहे, असे सांगून पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे वडील गंगाधर फडणवीस यांच्या सुसंस्कृत, सभ्य आणि दिलदार व्यक्तिमत्वाची आठवण करून दिली. अशा विधानामागे सत्ताप्राप्ती हे कारण असू शकेल, परंतु सत्ता ही विनयाने शोभिवंत होते, असा टोला त्यांनी लगावला. राज्याचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर स्वतंत्र विदर्भ राज्य करणारच अशी वक्तव्ये त्या भागातील केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करणे अनुचित आहे, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईविषयक समिती नेमण्यावरून निर्माण झालेल्या वादासंदर्भात बोलताना पवार म्हणाले, की राज्यांमध्ये अनेक प्रश्नांसाठी केंद्रीय वा राज्य समित्या नेमल्या जातात. मात्र राज्या-राज्यांतील अंतर्गत प्रश्नांबाबतची जबाबदारी नसताना ती पंतप्रधानांना देणे हे त्यांनाच अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे मुंबईविषयी समिती नेमताना ती कशा प्रकारची असावी याबाबत साधकबाधक विचार व्हावा. या लेखात जाता जाता पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आपल्या मिश्किल शैलीत चिमटा काढला. देशाचे पंतप्रधान हे संपूर्ण देशाच्या जनतेचे प्रमुख असतात. त्यांच्या मुंबईत येण्याबाबत बंदी असण्याचा प्रश्न उद्भवत नाही.. मुंबईतील महत्त्वाच्या संस्थांना पंतप्रधानांनी भेटी द्यायलाच हव्यात. याशिवाय त्यांनी नागपूरमधील रेशीमबाग किंवा उत्तन येथील केशवसृष्टी अशा संस्थांनाही भेट द्यावी; तेही आपण समजू शकतो, असे ते म्हणाले.

दुष्काळी भागाकडे लक्ष द्या
मुख्यमंत्र्यांनी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रासहित इतर दुष्काळी भागांवर अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन करतानाच मुंबई-पुण्याकडे येणारे नवे उद्योग आता थांबवावेत या सूचनेचा पुनरुच्चारही पवार यांनी केला. या लेखामध्ये त्यांनी केळकर समिती अहवाल, नागपूर अधिवेशनाचा कालावधी, मराठा-मुस्लीम आरक्षण अशा मुद्दय़ांवरही मते व्यक्त केली.