महाराष्ट्राच्या सर्वागीण विकासासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करत असून, अमेरिकेसारख्या देशाच्या भूमीवर कर्तृत्व गाजविलेल्या मराठी मंडळींनी साथ दिल्यास महाराष्ट्र हे एक सर्वोत्तम राज्य म्हणून नावारूपास येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लॉस एन्जेलिस (अमेरिका) येथे केले. अमेरिकेतील मराठी बांधवांशी महाराष्ट्राचा ऋणानुबंध वाढावा यासाठी तेथे ‘महाराष्ट्र परिचय केंद्र’ तातडीने कार्यान्वित करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली.
अमेरिका आणि कॅनडा या देशांमध्ये स्थायिक झालेल्या महाराष्ट्रातील मंडळींच्या बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे लॉस एन्जेलिस येथे आयोजित १७ व्या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी, मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी शैलेश शेटय़े, विवेक रणदिवे आदी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
परकीय भूमीवर कर्तबगारी गाजविणाऱ्या महाराष्ट्राच्या या सुपुत्रांबद्दल राज्याला आनंद आणि अभिमान वाटतो. अमेरिकेच्या वाटचालीत महाराष्ट्रातील जनतेचा लक्षणीय वाटा आहे. कर्तृत्व गाजविण्यासोबतच येथील मराठी माणसाच्या या पिढीने आपले मराठीपण निष्ठेने जोपासले आहे, ही बाब अभिमानास्पद आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी अमेरिकेतील मराठी माणसाच्या प्रगतीची प्रशंसा केली.
महाराष्ट्रात परिवर्तनाचे पर्व सुरू झाले असून राज्य आता वेगाने बदलत आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, मेक इन इंडिया ही महत्त्वाकांक्षी मोहीम यशस्वी करण्यासाठी ‘मेक इन महाराष्ट्र’ आवश्यक आहे, कारण महाराष्ट्र हे भारताचे ‘पॉवर हाऊस’ आहे.
‘मेक इन महाराष्ट्र’ हा केवळ एक नारा नाही, तर ती एक व्यापक लोकचळवळ आहे. इथल्या तरुणांना योग्य शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार देण्याची गरज आहे, ते देण्याचे काम आमचे सरकार करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.