काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणारा पश्चिम महाराष्ट्र, नरेंद्र मोदींच्या झंझावाती सभांमुळे गाजलेला मराठवाडा आणि उद्योगमंत्री नारायण राणेंची अग्निपरीक्षा पाहणारा रत्नागिरी-सिंधुदुर्ग अशा महाराष्ट्रांतील १९ लोकसभा मतदारसंघांमध्ये गुरुवारी शांतता आणि उत्साहाच्या वातावरणात मतदान पार पडले. उन्हाचा कडाका आणि काही भागांत झालेल्या पावसाच्या जोरदार सरींची फिकीर न करता ६२ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यामुळे गतवेळच्या तुलनेत या मतदारसंघातील मतदानाचा टक्का सरासरी १२ टक्क्यांनी वाढला आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजप नेते गोपिनाथ मुंडे, सुप्रिया सुळे, अशोक चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य आता मशिनबंद झाले असून येत्या १६ मे रोजी ते जगजाहीर होणार आहे.

पुण्यात हजारो मतदारांची नावेच गायब
वंचित मतदारांचा जिल्हाधिकाऱ्यांना घेराव
 पुणे :मतदार यादीतून नावे गायब होण्याच्या प्रकारामुळे हजारो मतदारांना गुरुवारी मतदानापासून वंचित राहावे लागले. नाव वगळण्यात आल्यामुळे झालेला मनस्ताप आणि भर उन्हात नाव शोधण्यासाठी करावी लागलेली वणवण यामुळे हजारो मतदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मतदानापासून वंचित राहावे लागलेल्या हजारो मतदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घातल्यानंतर ‘आलेल्या तक्रारी राज्य निवडणूक आयुक्तांमार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवून देऊ’ अशी भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री जाहीर केली.
पुण्यातील मतदानाला गुरुवारी सकाळी उत्साहात प्रारंभ झाला आणि थोडय़ाच वेळात यादीत नाव सापडत नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या. तासाभरातच या तक्रारी एवढय़ा वाढल्या की सर्व बूथवर तसेच मतदान केंद्रांमध्ये यादीतील नाव शोधणे हाच उद्योग सुरू झाला. फेब्रुवारी २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मतदान केले होते, त्यानंतर पत्ता बदललेला नाही मग यावेळी यादीतून नाव गायब कसे झाले, असा प्रश्न पुणेकर विचारत होते.
याद्यांमधील या गोंधळामुळे मतदानापासून वंचित राहिलेल्या संतप्त नागरिकांनी सायंकाळी विधान भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घातला. यापूर्वीच्या मतदानात वेळोवेळी मतदान केलेले हे नागरिक निवडणूक ओळखपत्र तसेच अन्य पुरावेही बरोबर घेऊन आले होते. नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांसमोर येत ध्वनिवर्धकावरून माहिती दिली. ते म्हणाले की, या तक्रारीसंबंधी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे. ज्यांचे मतदान होऊ शकले नाही त्यांचे लेखी निवेदन घ्यावे तसेच राजकीय पक्षांची निवेदने घेऊन जिल्हा प्रशासनाचा अहवाल सोबत जोडावा, असे त्यांनी सांगितले आहे.

देशभरात उत्साह
देशात महाराष्ट्रासह एकूण १२१ जागांवर गुरुवारी मतदान झाले. या पाचव्या टप्प्यातील सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये ८२ टक्के इतके झाले, तर सर्वात कमी मतदान मध्य प्रदेशात ५४ टक्के झाले. मात्र, एकूण सर्वच ठिकाणी मतदारांनी उत्साह दाखवला. या टप्प्यातील निवडणुकीत एकूण १७६९ उमेदवार होते. यामध्ये जसवंत सिंह, सुषमा स्वराज, बायच्युंग भुतीया, नंदन निलेकणी यांच्यासह अनेक नामवंतांचा समावेश आहे.

कोकणात शांततेत
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात तणावपूर्ण वातावरणात मात्र शांततेत मतदान झाले. संगमेश्वर तालुक्यात कडवई येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पूर्ववैमनस्यातून मारामारीचा प्रकार घडला. मतदान सुरू झाल्यानंतर १४ मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाला. ती लगेच बदलण्यात आली.