राज्य सरकारने  ‘वाघ वाचवा’ मोहिमेसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन यांना साकडे घातले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत माहिती दिली. राज्यातील वाघांचे संरक्षण व्हावे आणि त्यांची संख्या वाढावी या उद्देशाने राज्य सरकारच्या ‘वाघ वाचवा’ मोहिमेचे सचिन तेंडुलकर आणि अमिताभ बच्चन यांनी ब्रॅण्ड अॅम्बेसेडर व्हावे, असे पत्र राज्य सरकारकडून या दोघांनाही पाठविण्यात आल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
‘वाघ वाचवा’ मोहिमेसाठी ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होणाऱया व्यक्तीला देण्यात येणाऱया मानधनाबाबत विचारले असता, ‘मान्यवरांना याचे कोणतेही मानधन सरकारकडून देण्यात येणार नाही. आर्थिक अटींशिवाय दोघांनीही सामाजिक बांधिलकीतून हा पुढाकार घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे’, असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले. दरम्यान, सचिन आणि अमिताभ यांनी सरकारच्या पत्राचे अद्याप उत्तर दिलेले नाही.