संघर्षयात्रेविरोधात संवादयात्रा; चंद्रशेखर, अडवाणी, रामाराव, राजशेखर रेड्डी यांच्या यात्रा यशस्वी

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्षयात्रेला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या वतीने संवाद यात्रा काढण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यामुळे राज्याचे राजकारण यात्रांनी ढवळून निघणार आहे. देशाच्या राजकारणात विविध नेत्यांच्या यात्रांनी राजकीय वातावरण बदलले होते किंवा काही नेत्यांना सत्तेचा सोपान गाठणे या यात्रांनी शक्य झाले होते.

अनेक वर्षे सत्ता उपभोगलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी रस्त्यावर उतरणे हे मोठे आव्हान होते. कर्जमाफीच्या मागणीवरून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या गोंधळात १९ आमदारांना निलंबित करण्यात आले. तेव्हा वीरेंद्र जगताप, जीतेंद्र आव्हाड, सुनील केदार, हर्षवर्धन सकपाळ आदी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तरुण आमदारांनी थेट जनतेत जाण्याची कल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात उतरविली. रणरणत्या उन्हात यात्रेला कितपत प्रतिसाद मिळेल, अशी शंका घेतली जात होती. पण तरुण आमदारांनी आग्रह धरल्याने यात्रा काढण्यात आली. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र अशा विभागांमध्ये तीन टप्प्यांमध्ये यात्रा काढण्यात आली. चौथ्या टप्प्यात कोकणात यात्रा काढण्यात येणार आहे. कर्जमाफीच्या मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या या यात्रेला राज्यात सर्वत्रच चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे. संघर्षयात्रेला काहीच प्रतिसाद मिळाला नाही, असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला असला तरी, भाजपचे नेते खासगीत मात्र या यात्रेमुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात मत तयार होत असल्याची भावना व्यक्त करतात. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या संघर्षयात्रेला मिळालेल्या प्रतिसादामुळेच भाजपला संवाद यात्रा काढावी लागल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. आता जून महिन्यात भाजपची संवादयात्रा राज्यात सर्वत्र फिरेल. सत्ताधाऱ्यांच्या वतीने मोठय़ा प्रमाणावर गर्दी जमवून वातावरणनिर्मिती केली जाईल.

यात्रा आणि पंतप्रधानपद

विविध राजकीय नेत्यांनी वेळोवेळी देशात यात्रा काढल्या आहेत. यापैकी ज्येष्ठ समाजवादी नेते चंद्रशेखर यांनी काढलेल्या भारत यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. पुढे चंद्रशेखर हे पंतप्रधान झाले. १९८३ मध्ये देशातील नागरिकांच्या समस्या समजावून घेण्याकरिता ही यात्रा चंद्रशेखर यांनी काढली होती. तत्कालीन इंदिरा गांधी सरकारच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्यात चंद्रशेखर यशस्वी झाले होते. रामजन्मभूमी आंदोलनात माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी काढलेल्या रथयात्रेमुळे देशाच्या राजकारणाचा पोतच बदलला. सारे वातावरण बदलले. बिहारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी अडवाणी यांची यात्रा थांबविली होती. अडवाणी यांना या यात्रेने भाजपला चांगलाच राजकीय फायदा झाला.

एन. टी. रामाराव यांनी १९८२च्या निवडणुकीपूर्वी काढलेल्या यात्रेने आंध्र प्रदेशमधील राजकीय वातावरण बदलले. तेलगू स्वाभिमानाच्या मुद्दय़ावर १९८२ मध्ये आंध्रमध्ये रामाराव यांना सत्ता मिळाली होती. २००४च्या निवडणुकीपूर्वी आंध्रमध्ये काँग्रेस नेते वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी पदयात्रा काढली होती. विधानसभा निवडणुकीत राजशेखर रेड्डी यांना त्याचा फायदा झाला होता. चित्रपट अभिनेते सुनील दत्त यांनी पंजाब पेटला असताना शांतीयात्रा काढली होती. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर गेल्या वर्षी यात्रा काढली होती. पण या यात्रेचा काँग्रेसला काहीच फायदा झाला नाही. कारण उत्तर प्रदेशसारख्या मोठय़ा राज्यात काँग्रेसचे फक्त आठ आमदार निवडून आले आहेत.

शरद पवार आणि मुंडे यांच्या यात्रा

राज्यात शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे या दोन नेत्यांच्या यात्रा गाजल्या. १९८२ मध्ये विरोधी पक्षनेते असताना शरद पवार यांनी जळगाव ते नागपूर अशी शेतकरी दिंडी काढली होती. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची संघर्ष यात्रा गाजली होती.