राज्याच्या ग्रामीण भागात थंडीची लाट आली असली तरी मुंबईतील पारा मात्र १७ अंशाखाली जाण्यास तयार नाही. येत्या काही दिवसात मुंबईच्या तापमानात लक्षणीय फरक पडण्याची चिन्हे नसली तरी गेल्या दहा वर्षांमधील डिसेंबर महिन्याच्या नोंदी पाहता वर्षांखेरीस तापमापकातील पाऱ्याने तळ गाठल्याचे स्पष्ट होते. सध्या वातावरण उबदार असले तरी नवीन वर्षांचे स्वागत करताना मुंबईकरांना गारठा अनुभवता येण्याची mu07शक्यता आहे.
सोमवारी, १५ डिसेंबर रोजी सांताक्रूझ येथे १२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. हे या मोसमातील सर्वात कमी किमान तापमान होते. मात्र गेले पाच दिवस तो १७ ते २० अंश से. दरम्यान तो झुलत राहिला आहे. राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. नांदेड येथे सर्वात कमी किमान – ८ अंश सेल्सिअसची नोंद झाली. नाशिक येथे ८.६ तर नागपूर येथे ९.९ अंश से. तापमान राहिले. मुंबई वगळता अलिबाग, रत्नागिरी याठिकाणीही किमान तापमान २० अंश से. दरम्यान आहे. वाऱ्याची दिशा पाहता पुढील तीन दिवस या तापमानात फारशी घट होण्याची शक्यता नाही, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.
रविवारी, सांताक्रूझ येथे १७.४ अंश से. तापमान होते. यात फारसा फरक होणार नसला तरी गेल्या दहा वर्षांमधील मुंबईतील तापमानाच्या नोंदी पाहता सर्वात कमी किमान तापमान वर्षांच्या शेवटच्या दिवसांमध्ये राहिल्याचे स्पष्ट होते. गेल्या दहा वर्षांत महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडय़ात तापमान कमी झाल्याचे दिसते. त्यातच २००७ पासून (२०१० व २०१३ चा अपवाद वगळता) डिसेंबरमधील सर्वात कमी तापमानाची नोंद ही अखेरच्या चार दिवसात झाली आहे. इतर वर्षांमध्येही अखेरच्या चार दिवसांमध्ये तापमानाचा पारा खाली आल्याची नोंद आहे.