वस्तू व सेवा कर विधेयक हे महाराष्ट्राच्या हिताचे नसून राज्याला दिवाळखोरीकडे नेणारे असल्याची जोरदार टीका काँग्रेसचे आमदार नारायण राणे यांनी सोमवारी विधान परिषदेत केली. ‘एक देश, एक कर’ अशी घोषणा हे विधेयक आणताना करण्यात आली होती. त्यालाही हरताळ फासण्यात आला असून संपूर्ण जगात नसेल एवढी म्हणजे जवळपास २८ टक्के करवाढ या जीएसटीमुळे होणार असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.

राज्यात जीएसटी लागू झाल्यानंतर एकीकडे करवाढ होणार असली तरी उत्पन्नात जवळपास ३५ टक्क्यांनी घट होणार असून महाराष्ट्र यामुळे केवळ कमकुवत होणार नसून डबघाईला आल्याशिवाय राहणार नाही, असेही राणे यांनी सांगितले. आज अमेरिकेत ११.७ टक्के कर आहे. जर्मनीत १७.५ टक्के, जपानमध्ये १६ टक्के, चीनमध्ये १७ टक्के, तर रशियात २४ टक्के कर असून जीएसटीनंतर राज्यातील कराची पातळी २८ टक्के एवढी होणार आहे. करांच्या बाबतीत आपण जगात प्रथम क्रमांकावर असू, असा टोलाही त्यांनी लगावला.

महाराष्ट्राला खिळखिळे करण्याचेच काम कायम दिल्लीने केले आहे. आताही या धोरणात कोणताही बदल दिसत नाही. राज्याचा आर्थिक वाटा कधीही पूर्णपणे दिल्लीने दिलेला नसून जीएसटीमुळे साऱ्या नाडय़ा यापुढे दिल्लीच्याच हाती राहणार आहेत. महाराष्ट्राची तिजोरी आजच खाली आहे. कर्जाचा डोंगर राज्यावर असून केवळ व्याजापोटी ३२ हजार कोटी रुपये चुकवावे लागणार आहेत. राज्याचा वाटा तसेच महापालिकेचा हिस्सा जर वेळेत मिळाला नाही तर त्याची जबाबदारी राज्य शासन घेणार आहे का, असा सवालही त्यांनी केला.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबई पालिकेला जकातीच्या माध्यमातून सात हजार कोटी रुपये मिळतात. त्याची जबाबदारी केंद्र शासनाने न घेतल्यास उद्या मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा पगार तरी होऊ शकेल का, असा प्रश्न करतानाच समजा उद्या नैसर्गिक आपत्ती अथवा कर्जमाफी करायची असेल तर सरकार पैसा आणणार कोठून, असा सवालही त्यांनी केला. सरकारची तिजोरी रिकामी असताना गरज पडल्यास सरकार तिजोरी खाली करेल, अशी वक्तव्ये केली जातात, असे सांगून  राणे म्हणाले की, खोटी आकडेवारी देऊन केवळ दिशाभूल करण्याचेच काम सरकार करत आहे. वर्षांला दोन कोटी लोकांना रोजगार देण्याच्या घोषणा भाजप सरकारने केल्या. गेल्या अडीच वर्षांत दीड लाख लोकांना तरी नोकऱ्या मिळाल्या का, याचे उत्तर द्यावे, असे राणे म्हणाले.

दरोडेखोरांसोबत सत्तेत कसे बसता?

राजीनामा देण्यापासून ते सत्तेतून बाहेर पडण्यापर्यंत शिवसेनेच्या नेतृत्वाने अनेक वल्गना केल्या असल्या तरी टक्केवारीचे महत्त्व त्यांना जास्त वाटत असल्यामुळे शिवसेना राज्यातील सत्तेला चिकटून आहे. एकीकडे सत्तेतील लोक दरोडेखोर आहेत अशी टीका करायची आणि त्याच दरोडेखोरांबरोबर सत्तेत बसणारी शिवसेना ही अर्धा वाटा मिळाल्याशिवाय सत्तेत बसते का, असा सवाल नारायण राणे यांनी केला. सेना आमदारांनीही राणे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.