राज्यातील वेगवेगळ्या विद्यापीठांतील अभियांत्रिकी शिक्षणाचा घोळ संपविण्याबरोबरच जागतिक स्पर्धेसाठी दर्जेदार अभियंते तयार व्हावेत यासाठी नाशिक येथील ‘आरोग्य विज्ञान विद्यापीठा’प्रमाणे अभियांत्रिकी अभ्यास आता एकाच तंत्रज्ञान विद्यापीठाच्या छत्राखाली आणण्यात येणार आहे. लोणार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या (बाटू) अखत्यारीत राज्यातील सर्व अभियांत्रिकी तसेच फार्मसी महाविद्यालये आणण्याची योजना असून, पुढील वर्षीपासून ती कार्यान्वित करण्यात येणार आहे.
‘बाटू’च्या माध्यमातून राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये एकाच छत्राखाली आणण्याचा प्रयत्न यापूर्वीही करण्यात आला होता. तथापि काही शिक्षणसम्राटांच्या विरोधामुळे हा प्रयोग फसला होता.
सध्या वेगवेगळ्या विद्यापीठांत अभियांत्रिकीचे वेगवेगळे अभ्यासक्रम चालतात. गणपती यादव समितीच्या शिफारशीनुसार एकच विद्यापीठ निर्माण करताना अध्यापकांचा दर्जा, तंत्रशिक्षण संचालनालयाचे तसेच स्थानीय चौकशी समित्यांचे बळकटीकरण, अभ्यासक्रमाचा दर्जा उंचाविण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. याबाबत मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव आणावा लागणार असला तरी यापूर्वी अधिवेशनात अभियांत्रिकी विद्यापीठाच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे, असे ‘डीटीई’च्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पंधरा कोटींच्या निधीची तरतूद
आता उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘डॉ. गणपती यादव समिती’च्या शिफारसीनुसार राज्यासाठी एकच तंत्रशिक्षण विद्यापीठ निर्माण करण्याचा निर्णय घेतला असून, या नियोजित विद्यापीठासाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लोणार येथे हे विद्यापीठ असले तरी पुणे, औरंगाबाद, मुंबई व नागपूर येथे विद्यापीठाची चार प्रमुख केंद्रे स्थापन करण्यात येणार असून प्रत्येक केंद्राला एक उपकेंद्रही देण्यात येणार आहे.

सध्या राज्यात अभियांत्रिकीची ३६४ महाविद्यालये असून फार्माची १५० पदवी महाविद्यालये आहेत. अभियांत्रिकीच्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी सुमारे दीड लाख जागा असून, एकाच छत्राखाली अभ्यासक्रम आल्यास अभियांत्रिकीचा दर्जा निश्चित सुधारेल.
– डॉ. सु. का. महाजन,  राज्य तंत्रशिक्षण संचालक.