गेल्या दहा वर्षांत लोकसंख्या, दरडोई उत्पन्न आणि क्षेत्रफळ यांमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन, त्या आधारावर राज्य शासनाने राज्यातील महापालिकांच्या वर्गीकरणात सुधारणा केली आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेला ‘अ’ वरुन ‘अ +’, पुणे व नागपूर या महापालिकांना ‘ब’ वरुन ‘अ’ वर्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. ‘ड’ वर्गात मोडणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिका, वसई-विरार व औरंगाबाद या महापालिकांचा ‘क’ वर्गात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या महापलिकांना आता आयएएस अधिकारी आयुक्त म्हणून मिळेल, प्रशासकीय यंत्रणा मजबूत होण्यास त्याची मदत होईल.
राज्यात २६ महापालिकांच्या सुधारीत वर्गीकरणाचा आदेश नगरविकास विभागाने सोमवारी काढला. त्यासाठी २०११ च्या जनगणेनुसार महापालिकांमध्ये झालेली लोकसंख्या वाढ, दरडोई उत्पन्नातील वाढ आणि दरडोई क्षेत्रात झालेली वाढ या निकषांवर त्यांची श्रेणी ठरविण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड, ठाणे व नाशिक या ‘क’ वर्ग महापालिकांचा ‘ब’ वर्गात समावेश झाला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या ‘क’ दर्जात कोणताही बदल झालेला नाही. उर्वरित महापालिकांचा ‘ड’ दर्जा कायम आहे. ज्या महापालिकांना दर्जा वाढ मिळालेली आहे, त्यांना केंद्र सरकार व  राज्य सरकारकडून अधिकचा निधी किंवा अनुदान मिळू शकते.