मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीच्या घटकपक्षांचा पाठिंबा शिवसेनेला मिळणार की भाजपला, हा कळीचा मुद्दा ठरणार असून त्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना महायुतीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर करण्याची भाजपची तयारी नाही. घटकपक्ष आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवून मुख्यमंत्रिपदावर दावा करण्याचा भाजपच्या उच्चपदस्थांचा विचार आहे. त्यामुळेच घटक पक्षांनी आपल्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवावी, असा भाजप व शिवसेनेचा प्रयत्न आहे.
महायुतीमध्ये रिपब्लिकन पक्ष, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी पक्ष आणि विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटना यांचा समावेश आहे. ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्याच्या अधिक जागा त्यांचा मुख्यमंत्री हे सूत्र युतीमध्ये ठरविले होते. शिवसेना व भाजपला मिळालेल्या जागांमध्ये मोठी तफावत असेल, तर मुख्यमंत्रिपदासाठी घटकपक्षांच्या मताला फारशी किंमत राहणार नाही. मात्र फारच कमी जागांची तफावत असेल, तर विरोधी पक्षनेतेपदावरून युतीमध्ये जसे कुरघोडीचे राजकारण झाले, त्याची पुनरावृत्ती मुख्यमंत्रीपदावरूनही होऊ शकते. ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करावे, असे सूतोवाच महायुतीच्या पहिल्या बैठकीत शिवसेना नेत्यांकडून झाले. मात्र भाजपने त्याला थंडा प्रतिसाद दिला. पुढील बैठकांमध्येही शिवसेना नेत्यांनी तसा आग्रह धरला तरी भाजपकडून महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव घोषित करण्यास मान्यता मिळण्याची शक्यता नाही.
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर जे वातावरण तयार झाले व भाजपला फायदा झाला, तसे वातावरण ठाकरे यांचे नाव घोषित केल्यावर होऊ शकते, अशी शिवसेना नेत्यांची भूमिका आहे. त्यामुळे ठाकरे यांना महायुतीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. मात्र मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्याची भाजपची तयारी नसल्याने निवडणुकीआधी ठाकरे यांचे नाव जाहीर करण्यास भाजपचा विरोध आहे. आपल्याला व घटकपक्षांना किती जागा मिळतात आणि त्यांचा पाठिंबा कोणाला राहील, यावर निकालानंतर निर्णय घ्यावा, अशी भाजपची खेळी आहे.
महायुती झाल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. युतीतील मुख्यमंत्रिपदाचे सूत्र लागू करताना घटकपक्षांना किती महत्त्व देणार, यावर शिवसेनेचा की भाजपचा मुख्यमंत्री हे ठरेल. त्यामुळे घटकपक्षांचे किती उमेदवार विजयी होतात आणि त्यांचा पाठिंबा भाजपला की शिवसेनेला, यावर मुख्यमंत्रिपद कोणाकडे हे ठरणार आहे.
– विश्वसनीय सूत्रांनी दिलेली माहिती