हिंदूंचा धार्मिक ग्रंथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा देण्यावरून देशातील राजकारण ढवळून निघाले असले तरी हाच ग्रंथ सातासमुद्रपार न्यूझीलंडच्या संसदेमध्ये फडकावीत एका मुंबईकराने सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. एवढेच नव्हे, तर ज्या शहरात गुन्हेगारांना जरब बसविणारा जेलर म्हणून काम केले त्याच (विलिंग्टन) शहराचा खासदार म्हणून न्यूझीलंडच्या संसदेमध्ये प्रतिनिधित्व करण्याचा पराक्रमही महेश िबद्रा या मुंबईकराने करून दाखविला आहे.
वयाच्या दहाव्या वर्षी सायन परिसरात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे चार शब्द कानावर पडल्यापासून राजकारणाची ओढ निर्माण झालेल्या बिंद्रा यांचे प्रत्यक्ष राजकारणाचे स्वप्न साकार झाले ते गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये. मुंबई विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात असलेल्या िबद्रा यांना त्यांच्या मित्रांनी न्यूझीलंडमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. मात्र त्या देशात नोकरीसाठी जाण्याकरिता पात्रता सिद्ध करावी लागली. या परीक्षेत अगदी काठावर पात्र ठरलेल्या बिंद्रा यांनी तेथे गेल्यावर माउंट एडन कारागृहात नोकरी पत्करली आणि त्यानंतर तब्बल १० वर्षे ते या कारागृहाचे जेलरही राहिले.
शपथविधीसाठी भगवद्गीता वापरण्याच्या तसेच संसदेला ती भेट म्हणून देण्याच्या बिंद्रा यांच्या या कृतीची तेथील पंतप्रधान तसेच आदिवासी खासदारांनीही दखल घेतली. शपथविधीनंतर आम्ही विरोधी पक्षातील असूनही पंतप्रधानांनी आपले जाहीर कौतुक करून भगवद्गीतेची प्रतही आदराने स्वीकारल्याचे बिंद्रा यांनी सांगितले.
न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर मॅचफिक्सिंगचा कलंक लागू नये यासाठी कठोर उपाययोजना केल्या जात असून मॅचफिक्सिंगमध्ये सहभागी होणाऱ्यांना पाच वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे. या समितीत आपण स्वत: असून ही तरतूद लवकरच केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यामुळे तेथेही भारतीय लोकांमध्ये उत्सुकता असून मोदी यांना आमंत्रित केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जेलर ते ‘फस्र्ट एमपी’
‘जेलर’ म्हणून काम करतेवेळी गुन्हेगारी आणि सामाजिक स्थितीचा जवळून अभ्यास केलेल्या बिंद्रा यांची पावले आपसूक तेथील राजकारणाकडे वळली. न्यूझीलंड फस्र्ट पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या बिंद्रा यांनी अल्पावधीतच या पक्षात आपले बस्तान बसविले आणि २०११ची संसदीय निवडणूक लढविली. मात्र विलिंग्टनमधील ज्या माउंट रॉस्कील मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली तेथे ते चक्क २१व्या क्रमांकावर फेकले गेले. मात्र या पराभवाने खचून न जाता त्यांनी पुन्हा ऑक्टोबर २०१४मध्ये निवडणूक लढविली. आणि फर्स्ट लिस्ट एमपी म्हणून ते संसदेत पोहोचले. विशेष म्हणजे पंजाबी असूनही शुद्ध मराठीत बोलणाऱ्या िबद्रा यांनी खासदारकीची शपथ घेतली ती भगवद्गीतेला स्मरून, तीही तेथील आदिवासींच्या माऊरी भाषेत. त्या वेळी संसदेतील अधिकाऱ्यांना भगवद्गीता मिळेना, म्हणून त्यांनी ही अडचण सांगताच बिंद्रा यांनी एका मंदिरातील भगवद्गीता संसदेत नेली आणि शपथविधीनंतर ती संसदेला भेटही दिली.