दीपेश टेके या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येप्रकरणी माहीम पोलिसांनी सरस्वती विद्यामंदिर शाळेच्या उपप्राचार्या नाडकर्णी यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दीपेशवर चोरीचा आळ घेतल्याने व्यथित होऊन त्याने माहीम रेल्वे स्थानकाजवळील लोकल ट्रेनखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती.
धारावीत राहणारा दीपेश टेके (१७) हा या शाळेत ९वीत शिकत होता. तो खो-खो खेळाडू होता. शाळेतून काही क्रीडा प्रमाणपत्रांची चोरी झाली होती. त्याचा आळा दीपेशवर ठेवण्यात आला होता. त्याने दीपेश व्यथित झाला होता. भर वर्गात त्याला जाब विचारला गेल्याने तो अपमानित झाला होता. त्याच्यावर चोरीची लेखी कबुली देऊन शाळा सोडण्यासाठी दबाव टाकला जात होता. त्यामुळे त्याने सोमवारी लोकलखाली उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वीही त्याने आईला आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते. मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी सुरुवातीला अपमृत्यूची नोंद केली होती. दीपेशच्या आई-वडिलांनी माहीम पोलीस ठाण्यात शाळेविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शाळेच्या उपप्राचार्या नाडकर्णी यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील देशमुख यांनी दिली.