मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. द्रुतगती मार्गावरील रसायनी परिसरात मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लेनमध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातग्रस्त वॅगन आर कार ही मुंबईच्या दिशेने येत होती. या गाडीत एकूण पाचजण होते. हा अपघात इतका भीषण होता की, अपघात झाल्यानंतर सुरूवातीला कार तब्बल ३० मीटर अंतरापर्यंत फरफटत गेली. त्यानंतर ही कार पुलावरून थेट २५ ते ३० फूट खाली कोसळली. त्यामुळे गाडीतील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, गाडीतील एका व्यक्तीला किरकोळ स्वरूपाचा मार लागला आहे. या सर्व जखमींवर नजीकच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.