चित्रपट आणि मालिका निर्माती एकता कपूर हिच्या चांदिवली येथील स्टुडिओला शुक्रवारी रात्री आग लागली. या आगीत एक स्थानिक कामगार आणि अग्निशमन दलातील जवान किरकोळ जखमी झाला. मात्र रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना तात्काळ घरी सोडण्यात आले.
चांदिवली येथील साकीनाका रोडवरील आंबेडकर चौकाजवळीच्या नॅन्सी मुन्सी शाळेनजिक एकता कपूर यांचा स्टुडिओ आहे. या स्टुडिओजवळ फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. फटाक्याची ठिणगी स्टुडिओतील भंगारावर पडली आणि भंगाराने पेट घेतला. रात्री १० च्या सुमारास घडलेल्या या घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलातील जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत रात्री १ वाजता आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत एक स्थानिक कामगार आणि आग विझविणारा अग्निशमन दलातील अग्निशामक किरकोळ जखमी झाला. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. उपचार केल्यानंतर या दोघांनाही रुग्णालयातून घरी पाठविण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.