अनेक उद्योगसमूहांचे राज्यात गुंतवणुकीचे आश्वासन; मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक प्रगतीविषयी माहिती

उद्योगांना चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मेक इन महाराष्ट्र’चे आयोजन देशाबाहेर प्रथमच स्वीडनच्या स्टॉकहोममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने गुरुवारी करण्यात आले. राज्यात उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध असून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत एक लाख कोटी डॉलर्सचा टप्पा निश्चित गाठेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

स्वीडनमध्ये ‘मेक इन इंडिया’ चे आयोजन करण्यात आले असून त्यात राज्यानेही ‘मेक इन महाराष्ट्र’चे प्रदर्शन केले आहे. राज्यातील आर्थिक प्रगतीविषयी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी माहिती दिली. मुंबई अर्थ-तंत्रज्ञान, पुणे, माहिती-तंत्रज्ञान तर नागपूर हे ‘लॉजिस्टिक हब’ असल्याचे सांगून देशातील प्रमुख उद्योग समूहांसह १०० हून अधिक स्वीडिश उद्योगसमूहही महाराष्ट्रात काम करीत आहेत, बंदर, रस्ते व रेल्वे विकासाची कामे सुरू असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. भारत पुढील काळात चीनऐवजी निर्मिती उद्योगांमध्ये मोठे स्थान मिळवील, असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी स्वीडनच्या व्यापारमंत्री एन लडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आदी उपस्थित होते.

या स्वीडन दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक उद्योगसमूहांशी चर्चा केली. बेअरिंग व सील उत्पादन क्षेत्रातील एसकेएफचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅलरिक डॅनियल्सन यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन पुण्यातील प्रकल्पविस्ताराबाबत चर्चा केली. अ‍ॅस्ट्रॉझेनेका फार्मास्युटिकल्सचे अतुल टंडन यांनी राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये प्रकल्प राबविण्याची तयारी दाखविली. ‘इकिया’ या  फर्निचर निर्मात्या उद्योगाने आपल्या उत्पादनात बांबूचा वापर करून या उत्पादनांचे ब्रॅण्डिंग करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला सहकार्य करावे, अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांनी कंपनीचे मुख्य नियंत्रण अधिकारी स्टेनमार्क यांच्याकडे केली. बांबूचा वापर वाढल्यास आदिवासींना रोजगार प्राप्त होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ  शकेल. रेसिफार्म एबी उद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी थॉमस एल्डर्ड यांनीही मुख्यमंत्र्यांशी गुरुवारी नागपूर येथील लॉजिस्टिक हबबाबत चर्चा केली.

स्मार्ट सिटी, घनकचरा व सार्वजनिक वाहतुकीसाठी सहकार्य

  • स्मार्ट सिटीच्या विकासासाठी तंत्रज्ञान आणि घनकचरा व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्य करण्याचे आश्वासन स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना राज्यातील विविध प्रकल्पांची माहिती दिली.
  • भारत आणि स्वीडनमधील उद्योगपती आणि संबंधितांची गोलमेज परिषदही झाली. देशात येणाऱ्या विदेशी गुंतवणुकीपैकी ५० टक्के महाराष्ट्रात येत आहे. राज्यातील उद्योग संधी, पायाभूत सुविधा आदींविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली
  • स्कॅनिया समूहाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मॅथियास कार्लबूम यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. हा उद्योगसमूह वाहननिर्मितीत अग्रेसर आहे. नागपूरमध्ये सध्या हा समूह कार्यरत असून अन्य शहरांमध्ये वाहतुकीसाठी बायोगॅस पुरविण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे. मुंबई, नागपूरमध्ये कचऱ्यातून मिथेन तयार करून त्यावर सार्वजनिक वाहतूक प्रकल्प चालविले जातील, असे फडणवीस यांनी सांगितले.
  • उड्डाण आणि संरक्षण क्षेत्रातील सॅब उद्योगसमूहाने संपूर्ण यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्रात आणण्याची तयारी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हॅकन बुश्खी यांनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीत दर्शविली.