राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपमध्ये हिंदू दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण छावण्या चालतात हे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे वक्तव्य हा काँग्रेसच्या व्यापक धोरणाचाच भाग आहे. संसदेवरील हल्ला प्रकरणातील आरोपी अफझल गुरू याला फाशी दिल्यावर अल्पसंख्याक समाजात त्याची प्रतिक्रिया उमटू नये, म्हणून हिंदू दहशतवादाचा मुद्दा उकरून काढीत काँग्रेसने अल्पसंख्याकांना चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
अल्पसंख्याक मतांचे धुव्रीकरण करण्याचा असाच पद्धतशीर प्रयत्न काँग्रेसने २००९च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वीही केला होता. तेव्हा अलिबागमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शरद पवार यांनी या मुद्दय़ाला हात घातला होता. पुढे काँग्रेसच्या नेत्यांनी त्याची री ओढली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीला त्याचा साहजिकच फायदा झाला होता. आता २०१४च्या निवडणुका लक्षात घेता काँग्रेसने हा प्रयोग पुन्हा सुरू केल्याचे मानले जाते. शिंदे यांनी जयपूरच्या शिबिरात जाणीवपूर्वक विधान केल्याचे काँग्रेसच्या उच्चस्तरीय वर्तुळातून सांगण्यात आले. कसाबपाठोपाठ अफझल गुरूला फाशी देण्याची केंद्राची योजना आहे. अफझल गुरूच्या फाशीवरून काश्मीर किंवा अल्पसंख्याक समाजात त्याची प्रतिक्रिया उमटू शकते. तत्पूर्वीच हिंदू दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसने अल्पसंख्याक समाजाला वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.