मालाडमधील शांतापाडा परिसर अजूनही पाण्यात; रस्ता हस्तांतरामुळे काँक्रीटीकरण रखडले

मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीनंतर शहरात ठिकठिकाणी साचलेले पाणी आता ओसरले असले तरी मालाड पूर्वेच्या शांतापाडा परिसरातील सबवेमध्ये शुक्रवारीही फूटभर पाणी होते. दरवर्षी संपूर्ण पावसाळ्यात तुंबून राहणाऱ्या या सबवे परिसरातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदाही काढल्या. मात्र त्याच वेळी या परिसरातील बीअर बारची वाट मोकळी करण्यासाठी राज्य सरकारने हा रस्ता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित केल्यामुळे आता ही निविदा प्रक्रिया नव्याने राबवावी लागणार आहे. परिणामी येथील तुंबलेल्या पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागणार आहे.

मालाड येथील रेल्वेमार्गाखालील सबवे दरवर्षी पावसाळ्यात तुंबतो व येथे वाहतूक कोंडी होते. असाच सबवे मालाड पूर्व येथील शांतापाडा परिसरातही आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गाखालून असलेला हा सबवे मालाड रेल्वेस्थानकाकडे तसेच महामार्गावर जाणाऱ्या वाहनांमुळे नेहमी गजबजलेला असतो. मात्र पावसाळाभर या सबवेमध्ये पाणी तुंबलेले असते. या कायमस्वरूपी तुंबलेल्या पाण्यातून वाहने जात असल्याने रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.हे पाणी उपसण्यासाठी  महानगरपालिकेकडून येथे कायमस्वरूपी पंपही सुरू ठेवला जातो, मात्र तरीही रस्त्यावरील पाण्याचा निचरा होत नाही.

हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येत असल्याने रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी या विभागाने निविदाही मागवल्या होत्या. परंतु सर्वोच्च न्यायालयाने महामार्गानजीक बीअर बारवर आणलेली बंदी आणि त्यानंतर बार खुले करण्यासाठी राज्य सरकारने महामार्गाचे केलेले हस्तांतर या प्रक्रियेच्या कचाटय़ात हा रस्ताही सापडला. या परिसरातील बार खुले करण्यासाठी राज्य सरकारने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एमएमआरडीएकडे हस्तांतरित केला. त्यामुळे आधीची निविदा प्रक्रिया रद्द झाली असून आता या रस्त्यासाठी नव्याने निविदाप्रक्रिया राबवावी लागणार आहे.

गैरसोयींचा पाढा

मंगळवारी पाऊस पडला तेव्हा या सबवेमध्ये पाणी पंपाने उपसले जात होते. मात्र संध्याकाळी सहा वाजता पालिकेचा पंप सुरू करणारा कर्मचारी निघून गेला व या सबवेमध्ये पाणी वाढले. आता पाऊस गेल्यावरही या ठिकाणच्या पाण्याचा निचरा झालेला नाही. साचलेल्या पाण्यामुळे रस्ता अगदी खराब झाला असून वाहनांच्या रहदारीमुळे असुरक्षितही आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पदपथ केले तर लहान मुलांना शाळेत जाताना सोयीचे होईल, मात्र तेही केले जात नाही, असे येथील रहिवासी साक्षी नामे यांनी सांगितले.

या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक टाकले आहेत. या रस्त्याची डागडुजी केली की पाणी साठण्याची समस्या कमी होईल. मात्र वाहतूक पोलीस हा रस्ता दोन ते तीन दिवस बंद करण्याची परवानगी देत नसल्याने काम रखडते आहे, असे स्थानिक नगरसेविका दक्षा पटेल म्हणाल्या.