मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी कर्नल पुरोहितची बुधवारी नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कर्नल पुरोहितला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आज सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुरोहित याला तुरूंगातून मुक्त करण्यात आले. सध्या भारतीय लष्कराच्या वाहनातून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहेत. पुरोहित याला थोड्याच वेळात कायदेशीर प्रकियांची पूर्तता करण्यासाठी मुंबईतील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. सूत्रांच्या माहितीनुसार, कर्नल पुरोहित अजूनही लष्करी सेवेत असल्यामुळे त्याने सैन्याला रिपोर्टिंग करणे अपेक्षित आहे. त्यासाठी त्याला पुण्यातील भारतीय सैन्याच्या दक्षिण विभागाच्या मुख्यालयात नेण्यात येईल, असे समजते. मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी कर्नल पुरोहितला आठ वर्ष आठ महिने तुरुंगात राहावे लागले होते.

https://twitter.com/ANI/status/900226419044876288

कर्नल पुरोहितला सोमवारी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर करताना सुप्रीम कोर्टाने काही अटी घातल्या आहेत. पुरोहितने देश सोडू नये आणि कुठल्याही साक्षीदारास थेट किंवा अप्रत्यक्षपणे प्रलोभन दाखवू नये, असे कोर्टाने म्हटले होते. परंतु, बॉम्बस्फोटाच्या खटल्याचा निकाल लागण्यास दीर्घ कालावधी लागू शकतो, अशा परिस्थितीत जामीन मिळावा, ही त्याची विनंती स्वीकारार्ह असल्याचे दिसते. या प्रकरणातील इतर आरोपींच्या जामीन अर्जांवरील निर्णयासाठी हा निकाल पथदर्शी असल्याचे गृहीत धरण्यात येऊ नये असे खंडपीठाने स्पष्ट केले होते.

मंगळवारी विशेष न्यायालयात सुनावणीसाठी पुरोहितला हजर करण्यात आले होते. न्यायालयाबाहेर प्रसारमाध्यमांनी पुरोहितची प्रतिक्रिया घेतली. ‘बॉम्बस्फोटात अडकवण्यात आल्याचे वाटते का?’ असा प्रश्न पुरोहितला विचारण्यात आला. यावर पुरोहित म्हणाला, यात वाटण्याचा संबंध नाही. हेच सत्य आहे, मला गुन्ह्यात अडकवलं. जामीन मंजूर झाल्याच्या निर्णयावर पुरोहितने आनंद व्यक्त केला. मी या निर्णयावर समाधानी आहे. आता मी माझ्या दोन्ही कुटुंबात परतणार आहे. यातील पहिलं कुटुंब म्हणजे माझी पत्नी, तर दुसरं कुटुंब म्हणजे लष्कर असे त्याने सांगितले.