मुंगूस आणि कुत्र्यांच्या त्रासाने वंशवृद्धीही संकटात

तब्बल ४७ एकरांवर पसरलेला राजभवनाचा परिसर.. गर्द झाडी.. नीरव शांतता.. भरपूर हवा.. अशा आल्हाददायक वातावरणात वावरणारे मोर खरे तर धष्टपुष्ट असायला हवेत.. मात्र परिस्थिती नेमकी उलटी आहे. राजभवनाच्या आसऱ्याला असूनही येथील मोर कुपोषित असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खाण्याची गैरसोय, भटकी कुत्री आणि मुंगसांचा त्रास यामुळे कुपोषित असलेल्या मोरांची वंशवृद्धीही धोक्यात आली आहे. तसेच कुपोषणामुळे अंगात त्राण न राहिल्याने या मोरांना धड उडताही येत नाही. परिणामी राजभवन परिसराभोवती असलेल्या संरक्षण भिंतीला आपटून मोरांचा मृत्यू होत असल्याचेही आढळून आले आहे.
राजभवन परिसरात सध्या १२ मोर असून त्यांना अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मोरांची ही दयनीय अवस्था पाहून राज्यपाल विद्यासागर राव यांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी मायव्हेट ट्रस्ट अँड रिसर्च सेंटर या संस्थेच्या पशुवैद्यकीय तज्ज्ञांना पाचारण केले. संस्थेचे सचिव डॉ. युवराज कागिनकर यांच्या पथकाने परिसराची पाहणी केली असता पोषक आहार मिळत नसल्याने मोरांचे कुपोषण होत असल्याचे आढळून आले. मुंगूस व कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे मोर जखमी होतात तसेच अंगात त्राण नसल्याने उडता येत नाही व संरक्षक भिंतीला धडकून मोरांचे मृत्यू होत असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. पूर्वी मोरांची संख्या १४ होती. आता ती १२वर आली असल्याचे राजभवनातून सांगण्यात आले. राज्यपाल आता स्वत: मोरांच्या संरक्षणासाठी पुढे सरसावले आहेत. त्यांच्या सूचनेवरून मायव्हेट संस्थेने मोरांच्या संरक्षणाची व मोरांची वंशवृद्धी करण्यास पर्यावरणपूरक अशी एक योजना तयार केली आहे. त्याचा प्रस्ताव राज्यपालांना सादर करण्यात आला आहे. पुढील वर्षभरात मोरांची संख्या २० ते २५ होईल, अशी हमी संस्थेने दिली आहे. मोरांच्या संरक्षणाची योजना अमलात आणण्यासाठी ३५ लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून (सीएसआर फंड) अर्थसाहाय्य मिळविण्याचा राजभवनाचा विचार असल्याचे सांगण्यात आले.

राजभवन परिसरात मुंगसांची संख्या खूप आहे.
ते लांडोराने घातलेली अंडी फोडतात, पिल्लांना खातात. तसेच भटकी कुत्रीही मोर व त्यांच्या पिल्लांवर हल्ला करतात. त्यामुळे मोरांची संख्या येथे वाढलेली नाही. वंशवृद्धीही थांबलेली आहे.
– डॉ. युवराज कागिनकर, पशुवैद्यकीय तज्ज्ञ