टाटा ट्रस्टच्या साह्य़ाने पालघर जिल्ह्य़ात अंमलबजावणी

आदिवासी भागातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी आदिवासी विभाग, महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभागाच्या समन्वयातून योजनाबद्ध प्रयत्न करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊनही कुपोषणाच्या विळख्यातून आदिवासी बालकांना बाहेर काढणे शक्य झालेले नाही. या पाश्र्वभूमीवर पालघरमघील कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी टाटा ट्रस्टने सहकार्याचा हात पुढे केला आहे. टाटा ट्रस्टच्या साहाय्याने पालघरमध्ये विशेष योजना राबविण्यात येणार असून त्या माध्यमातून कुपोषणाच्या प्रश्नावर मात करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील कुपोषित आदिवासी बालकांची संख्या ११,५२६ असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मान्य केले. प्रत्यक्षात ही संख्या जवळपास पन्नास हजार एवढी आहे. आरोग्य संचालनालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या २०१६च्या अहवालातच २०१४-१५ मध्ये मध्यम तीव्र व तीव्र कुपोषित बालकांची नोंद ३७,९५३ एवढी करण्यात आली आहे तर २०१५-१६ मध्ये २४,४२० कुपोषित बालके आढळून आली आहेत. राज्यातील सोळा आदिवासी जिल्ह्य़ांमध्ये राहणाऱ्या आदिवासींच्या विकासासाठी राज्य शासनाच्या कागदोपत्री अनेक योजना आहेत. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या योजना आदिवासींपर्यंत पोहोचतच नसल्याचा आरोप माजी आमदार विवेक पंडित यांनी केला. त्यातही पालघरमध्ये गेल्या वर्षी झालेल्या बालमृत्यूची दखल राज्यपालांनीच घेतल्यानंतर सरकारी यंत्रणा थोडय़ाफार प्रमाणात हलू लागली. मंत्र्यांचे दौरे झाले; मात्र त्यानंतर सारे पुन्हा ठप्प झाल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून टाटा ट्रस्टसमवेत जीवनसत्त्वयुक्त दूध तयार करण्याचा प्रकल्प उभारणी व पालघरमधील कुपोषणाच्या समस्यांवर मात करण्यासाठी सहकार्य करार करण्यात आला. टाटा ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त आर. वेंकटरमणन व डॉ. आनंद बंग हे या वेळी उपस्थित होते. वरळी येथील आरे दूध प्रकल्पात ‘अ’ आणि ‘ड’ जीवनसत्त्वाचा समावेश करून ‘समृद्ध दूध’ तयार करण्याचा प्रकल्प टाटा ट्रस्टच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.

टाटा ट्रस्टने प्रमाणित केलेल्या जीवनसत्त्वांचे मिश्रण दुधामध्ये मिसळण्यात येणार असून या दुधाची विक्री आरेच्या सर्व स्टॉल्सवर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पालघर जिल्ह्य़ाला कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी विद्यमान आंगणवाडी केंद्रांचे सक्षमीकरण करणे, गावपातळीवर दर महिन्याला आरोग्य व पोषण आहार दिन साजरा करणे, आंगणवाडी स्वयंसेविकांना प्रशिक्षण देणे, पोषण आहार अंमलबजावणीसाठी राज्य व जिल्हा पातळीवर प्रशिक्षित समूह तयार करणे आणि घरपोच आहार योजनेंतर्गत थेट लाभार्थीना त्याचा लाभ मिळेल याची काळजी घेण्याचे काम टाटा ट्रस्टच्या माध्यमातून केले जाणार आहे.