मुंबई उपनगरात तब्बल १३ अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या वासनापिसाटाला (सिरीयल मोलेस्टर) अखेर बुधवारी डी.एन. नगर पोलिसांनी जुहू येथून अटक केली. अय्याज मोहम्मद अन्सारी (३५) असे त्याचे नाव असून तो सराईत मोबाइल चोर आहे. त्याने तब्बल अशा पध्दतीने २५ मुलींचा विनयभंग केल्याची कबुली दिली आहे.
अन्सारीवर सायन, डीएन नगर, अंबोली, वाकोला, वर्सोवा, जुहू, निर्मल नगर, अंधेरी, गोरेगाव, सांताक्रुझ आदी पोलीस ठाण्यात विनयभंगाचे तब्बल १३ गुन्हे दाखल होते. तो ८ ते १३ वर्षे वयोगटातील शाळकरी मुलींना आपले लक्ष्य बनवत होता. त्यांना रस्त्यात गाठून मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे आणि त्यांना एक फोन क्रमांक द्यायचा आहे, असे सांगत जवळील एकांतात नेऊन विनयभंग करत होता. सायन आणि अंधेरी येथील घटनांधील सीसीटीव्ही चित्रणावरून त्याची ओळख पटली होती. त्याच्या अटकेसाठी गुन्हे शाखेने विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. तो एका डोळ्याने अधू होता. तोच एकमेव दुवा होता. त्याची रेखाचित्रे बनविण्यात आली होती. बुधवारी त्याला डीएन नगर पोलिसांनी अंधेरीच्या गिल्बर्ट हिल येथून अटक
केली.
अन्सारी याला २०१३ मध्ये मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात अटक झाली होती. त्यानंतर तो जामिनावर सुटला होता. अटक होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारीही त्याने मालाड येथून एक आय फोन चोरी केला होता. जी मुलगी फसेल असे वाटायचे तिलाच तो जाळ्यात ओढायचा. त्याच्या नावावर १३ विनयभंगाचे गुन्हे दाखल असले तरी त्याने अन्य १२ अशा पद्धतीच्या गुन्ह्याचीही कबुली दिली आहे. २०१२ पासून तो अशी कृत्य करत होता. एवढे गुन्हे करणारा आरोपी आमच्या साठी एक केस स्टडी आहे, असेही ते म्हणाले. तो आतापर्यंत कसा मोकाट राहील याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्याच्यावर बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.