खच्चून भरलेल्या लोकलच्या डब्यात कसेबसे स्वतला कोंबायचे..आत जायला जागा नाहीच मिळाली तर दारातच लटकून उभे राहायचे.. ही तमाम चाकरमान्यांची रोजची रडकथा. मात्र, ही गर्दीच जीवघेणी ठरते. रोहित सावंत (२४) या डोंबिवलीच्या तरुणासाठीही ही गर्दी काळ बनून आली. मुंब्रानजीक त्याचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. एकुलत्या एक मुलाच्या आकस्मिक निधनाने आई-वडिलांवर आभाळच कोसळले. रोहित लोकलगर्दीचा बळी ठरला असला तरी रेल्वे पोलिसांच्या लेखी त्याचा मृत्यू लोकलची धडक लागून झाला आहे!
डोंबिवली पश्चिमेकडील नीळकंठ सोसायटीत राहणारा रोहित अभिनेता श्रेयस तळपदे यांच्या ‘झुंज मराठमोळी’ या मालिकेत सहाय्यक संकलक म्हणून काम करत होता. त्यासाठी त्याला रोज अंधेरीला जावे लागायचे. सोमवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाला. मात्र, लोकलमधील गर्दीमुळे त्याचा मुंब्रा स्थानकानजीक गाडीतून पडून मृत्यू झाला. रोहित घाटकोपरला उतरून मेट्रोने अंधेरीला जाणार होता. तो मुंब्रा येथे उतरण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे लोकलच्या धडकेत नव्हे तर लोकलमधून पडूनच त्याचा मृत्यू झाला असून रेल्वे पोलिसांनी केलेली नोंद खोटी असल्याचा आरोप रोहितचे वडील संदेश सावंत यांनी केला आहे.
मध्य रेल्वे विस्कळीत : मध्य रेल्वेमार्गालगतचे एक मोठे झाड मंगळवारी सायंकाळी दादर स्थानकाच्या सहाव्या फलाटावरील ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे अप जलदगती मार्गावरील उपनगरीय वाहतूक विस्कळीत झाली. या मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावर वळवण्यात आली, तरी अनेक गाडय़ा खोळंबल्यामुळे, तसेच रद्द करण्यात आल्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले. सुमारे अडीच तासांनी ही वाहतूक सुरळीत होऊ शकली.