नवी मुंबईतील बेलापूर येथील संजीवनी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील शंभर चौरस फुटांच्या फ्लॅटमधून त्याला बाहेर काढल्यानंतर एकच वाक्य त्याच्या तोंडात होते, ‘दादा खायला द्या.. दादा खायला द्या’. खोलीचा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा तो एखाद्या लहान मुलासारखा रांगतच बाहेर आला. या वेळी डोळ्यावर अचानक पडलेला उजेडही त्याला सहन झाला नाही. तब्बल दहा वर्षांपासून अत्यंत वाईट अवस्थेत एकाच खोलीत डांबून ठेवलेल्या २२ वर्षीय राज पटेलची अंगावर शहारे आणणारे स्थिती पाहून शनिवारी सकाळी पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते काही काळ स्तब्ध झाले. राजला तातडीने डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर तेथे उपचार सुरू आहेत.

राजला गेली दहा वर्षे डांबून ठेवण्यात आले होते, असा आरोप त्याची सुटका करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी केला आहे. ‘संजीवनी’मधला हा फ्लॅट दीर्घकाळ बंद अवस्थेत होता. त्यात राजला डांबून ठेवण्यात आल्याची माहिती पटेल कुटुंबियांना ओळखणाऱ्या बहुतेकांना होती, मात्र राजच्या सुटकेनंतर त्याविषयी बोलण्यास कुणीही तयार नव्हते, असे संस्थांच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

पटेल कुटुंबीय याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहतात. राज याचे वडील व्यावसायिक असून त्यांच्या दहा मुलांपैकी राज एक आहे. पटेल कुटुंबीय गेली २२ वर्षे पाणी आणि विजेचीही सोय नसलेल्या या पडीक इमारतीत राहायला आहेत, अशी माहिती ‘दामिनी सेना’ स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा शारदा शहा यांनी दिली.

दरम्यान, राजची सावत्र आई आणि त्याच्या बहिणींना राजचे घरात राहणे मान्य नसल्याने त्याला अशा प्रकारे डांबून ठेवल्याचे शहा यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे.

सर्वत्र अस्वच्छता आणि दरुगधी
राजची सुटका करण्यासाठी प्रथम पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा तो बाहेर पडण्यास तयार झाला नाही. पोलिसांनी संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने राजला वडापाव देतो, असे सांगून दरवाजापर्यंत बोलावले आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी घरात प्रवेश केला, तेव्हा त्यांना सर्वत्र कचरा, पेपरांचे तुकडे आणि विष्ठा परसलेली दिसली. घराची अवस्था इतकी भयानक होती, की काही क्षण पोलिसांना आत प्रवेश करणेही मुश्कील झाले होते. अशा अमानवी अवस्थेत राज गेली दहा वर्षे राहत होता. या काळात त्याने आंघोळही केली नसल्याची शंका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांना आहे.