मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकातील फलाटावर सोमवारी सकाळी एका तरूण चक्क कार घेऊन घुसल्याचा प्रकार घडला. आज सकाळी सव्वासात वाजता हा प्रकार घडला. आरोपी तरुण हा क्रिकेटर असल्याचे कळते. मात्र, सुदैवाने कार आणखी पुढे न गेल्यामुळे मोठा अपघात टळला. याप्रकरणी २५ वर्षीय रणजीपटू हरप्रीत सिंगला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. मद्याच्या नशेत हरप्रीतने हे कृत्य केले का, हे तपासून पाहण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. मात्र, या घटनेमुळे मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळची वेळ असल्याने फलाटावर प्रवाशांची ट्रेन पकडण्यासाठी लगबग होती. मात्र, त्याचवेळी अंधेरी पश्चिमच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर तरुणाने चक्क कार आणली. कार फलाटावर आल्याचे पाहून सुरूवातीला प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. मात्र, सुदैवाने हरप्रीतने तोपर्यंत गाडीवर नियंत्रण मिळवले होते. या घटनेनंतर हरप्रीतला पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतले. भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात हरप्रीत सिंगचा समावेश होता. दरम्यान, हरप्रीतने चौकशीदरम्यान रस्ता चुकल्यामुळे आपण फलाटावर आल्याचे म्हटले आहे. मी सकाळी सहा वाजता प्रॅक्टिससाठी जात होतो. पण रस्ता चुकलो आणि प्लॅटफॉर्मवर आलो, असे त्याने सांगितले. यापूर्वीही अंधेरी स्थानकातील फलाट क्रमांक सहावर  एका व्यक्तीने कार आणल्याचा प्रकार घडला होता. २६\११ च्या पूर्वसंध्येला ही घटना घडली होती. जर ही गाडी स्फोटकाने भरलेली असती तर किती मोठा प्रसंग घडला असता असा प्रश्नही प्रवाशांकडून त्यावेळी उपस्थित करण्यात आला होता.