हुंडय़ासाठी छळवणूक करून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांतून आईवडील आणि मुलगा अशा तिघांची २१ वर्षांनंतर अखेर निर्दोष मुक्तता झाली आहे. या तिघांनी हुंडय़ासाठी विवाहितेचा छळ केल्याचा कुठलाही पुरावा पुढे आलेला नसल्याचा निष्कर्ष नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने या तिघांना दोषमुक्त केले.
शेखर परदेशी आणि त्याचे आईवडील श्रीराम व शंकुतला अशा तिघांनी सत्र न्यायालयाने त्यांना सुनावलेल्या पाच वर्षांच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांच्या अपिलावर निकाल देताना न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण यांनी तिघांची निर्दोष मुक्तता केली. १९९१ मध्ये सत्र न्यायालयाने या तिघांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती.
शेखर याचा १९८६ साली संगीताशी विवाह झाला होता. त्यानंतर चार वर्षांनी म्हणजेच ६ ऑगस्ट १९९० रोजी संगीताने पेटवून घेतले होते. त्यात तिचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या वडिलांनी शेखर आणि त्याच्या आईवडिलांविरुद्ध हुंडय़ासाठी आपल्या मुलीचा छळ केल्यानेच तिने हे पाऊल उचलल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मागण्या पूर्ण न केल्याने शेखर आणि त्याच्या आईवडिलांनी संगीताला अनेकदा माहेरी पाठवले होते, असा आरोपही संगीताच्या वडिलांनी केला होता.
शेखर आणि त्याच्या आईवडिलांच्या दाव्यानुसार लग्न झाल्यापासून संगीता कुणाशीही चांगली वागत नव्हती. त्यामुळेच तिला माहेरी पाठविण्यात आले होते. संगीता आणि त्याने एकमेकांना या काळात लिहिलेल्या पत्रांचा दाखला त्यांनी न्यायालयाला दिला होता. त्याच पत्रांच्या आधारे त्यांनी ती आपली वागणूक बदलण्यासाठी तयार होऊन घरी परतल्याचेही अपिलावरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायमूर्ती चव्हाण यांनी ही बाब मान्य करीत तसेच आरोपींनी संगीताची हुंडय़ासाठी छळवणूक केली आहे हे सिद्ध करणारा कुठलाही पुढे आलेला नाही, असा निष्कर्ष नोंदवत तिघांची निर्दोष मुक्तता केली. समोर आलेल्या पुराव्यांवरून संगीताची शारीरिक वा मानसिक छळवणूक केल्याचे कुठेही सिद्ध झालेले नाही, असेही न्यायालयाने हा निकाल देताना म्हटले.