कल्याणमधून इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून एका तरूणाला अटक करण्यात आली आहे. केरळ पोलीस आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत या तरूणाला अटक केल्याचे समजते आहे. सुत्रांच्या माहितीनुसार  अटक केलेल्या संशयिताचे नाव रिझवान खान असल्याचे समजेत आहे. एका जोडप्याचे धर्मांतर करून त्यांना इसिसमध्ये भरती करण्यासाठी मदत केल्याचा आरोप रिझवानवर आहे. दोन दिवसांपूर्वी  केरळ पोलीस आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत आर्शी कुरेशी या संशयिताला नवी मुंबई येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली होती. मरिअम नावाच्या महिलेला इसिसमध्ये भरती केल्याचा आरोप त्याच्यावर होता. अर्शी हा झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च सेंटरमध्ये काम करायचा.

केरळमधून २१ जण गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. बेपत्ता झालेले हे सगळे इसिसमध्ये भरती झाले असावेत असा दाट संशय केरळ पोलिसांना आहे. त्यामुळे या बेपत्ता झालेल्यांचा शोध केरळ पोलीस घेत आहेत. या प्रकरणात केरळ पोलीस आणि महाराष्ट्र एटीएसने आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. पोलीस इसिस भरती प्रकरणात सामील असलेल्यांचा कसून शोध घेत आहे. इसिस ही दहशतवादी संघटनेने इंटरनेटच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात आपले जाळे पसरवले आहे. इसिस ही संपूर्ण जगाची डोकेदुखी ठरते आहे. जगभरातील अनेक तरूण या दहशतवादी संघटनेच्या जाळ्यात अडकत आहेत. या तरूणांना रोखण्याचे मोठे आव्हान आता देशापुढे उभे राहिले आहे.