शिवसेना पक्षप्रमुखांच्या वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानात चाकू घेऊन जाणे एका उत्साही कार्यकर्त्यांला चांगलेच महागात पडले. सुरक्षा तपासणीदरम्यान पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, मात्र त्याचा कुठलाही गुन्ह्य़ाचा उद्देश नसल्याचे स्पष्ट झाले
आहे.  काँग्रेसचे चेंबूर घाटला परिसरातले नगरसेवकर अनिल पाटणकर गुरुवारी शिवसेना पक्षात प्रवेश करण्यासाठी मातोश्री बंगल्यावर कार्यकर्त्यांसह गेले होते. त्यांच्यासोबत राममीलन शर्मा हा कार्यकर्तादेखील होता.
शर्मा हा व्यवसायाने नाभिक आहे. तपासणीदरम्यान त्याच्याकडे चाकू आणि ब्लेड आढळले. खेरवाडी पोलिसांनी त्याला पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले.  लिंबू कापण्यासाठी तसेच दैनंदिन कामासाठी ब्लेडची आवश्यकता लागत असल्याने ते मी सोबत बाळगतो, असे शर्माने पोलिसांना सांगितले.
रात्री उशिरा खेरवाडी पोलिसांनी शर्मा याच्यावर मुंबई पोलीस अधिनियम ३७(१) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. मातोश्री बंगल्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. तेथे कुठल्याही प्रकारचे शस्त्र तसेच अग्निशस्त्र घेऊन जाण्यास परवानगी नसते.

आम्ही त्याची चौकशी केली, मात्र काहीच संशयास्पद आढळून आलेले नाही. त्याच्याकडे असलेला चाकू छोटा असून तो त्याने अनवधानाने  आणला होता.
-वीरेंद्र मिश्रा, पोलीस उपायुक्त