वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रमेश बनसोडे यांना वाचविण्यावरून चक्क सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आणि त्यांच्याच राज्यमंत्र्यांमधील विसंवादाचे दर्शन बुधवारी विधान परिषदेत झाले. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या बनसोडे यांच्या बचावासाठी मंत्री आक्रमक असताना त्यांच्याच विभागाच्या राज्यमंत्र्यांनी बनसोडे यांच्या निलंबनाची घोषणा करीत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला.
अमरसिंह पंडित व अन्य सदस्यांनी वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रमेश बनसोडे यांच्या कारभाराबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीवरून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले होते.
बनसोडे यांची महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर करण्यात आलेली नियुक्ती बेकायदेशीर असतानाच आता त्यांची अपंग, वित्त आणि विकास महामंडळाच्या संचालकपदावरही नियुक्ती करण्यात आली आहे.
विभागाच्या सचिवांचा आक्षेप असतानाही त्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप असल्याचे पंडित यांनी सदनाच्या निदर्शनास आणले. त्याचप्रमाणे बनसोडे यांची त्वरित त्या पदावरून उचलबांगडी करण्याची मागणी विरोधकांनी केली. मात्र ही नियुक्ती तुमच्याच सरकारने केली असून न्यायालयानेही त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याचे सांगत बडोले यांनी बनसोडे यांचा बचाव केला.
बनसोड यांच्या निलंबनावरून विरोधक आणि मंत्री बडोले यांच्यात वादावादी सुरू असतांनाच भाजपाचे भाई गिरकर यांनीही विरोधकांच्या सुरात सूर मिसळत बनसोडे यांच्यावर कारवाईची मागणी केली.
त्यानंतरही बडोले अधिकाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत असतानाच राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी चर्चेत हस्तक्षेप करीत बनसोडे यांच्या निलंबनाची तसेच चौकशीची घोषणा केली.
कॅबिनेट मंत्री चर्चेत सहभागी असताना राज्यमंत्र्याने हस्तक्षेप करून दिलेल्या या कलाटणीमुळे सभागृहातील अनेकजण क्षणभर अवाक् झाले.