कारागृहातील मंजुळाचे वाढते वर्चस्व हे कारण वॉर्डन मंजुळा शेटय़ेच्या हत्येच्या मुळाशी असल्याची माहिती कारागृह प्रशासनाने केलेल्या प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.

तीन महिन्यांपूर्वी भायखळा कारागृहात आलेली मंजुळा कैद्यांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झाली होती. जेलर, अन्य वॉर्डन, गार्ड किंवा महिला पोलिसांऐवजी कैद्यांकडून मंजुळाचा शब्द पाळण्यात येत होता. हत्येच्या गुन्ह्य़ात ती शिक्षा भोगत असली तरी मंजुळा पेशाने शिक्षिका होती.

भायखळा कारागृहात येण्याआधी पुण्याच्या येरवडा कारागृहात तिने कैद्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार केला होता. निरक्षरमहिला कैद्यांना शिक्षणाची गोडी लावली आणि आपल्या हक्कांबाबतही जागृत केले. भायखळा कारागृहातही तिने हेच काम सुरू केल्याने कारागृहाच्या चार भिंतींआड पोलिसांच्या सत्तेला, दहशतीला पावलोपावली तडे जाऊ लागले. त्यामुळे तिचे व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कारागृह, उपाहारगृह, स्वयंपाकगृह, मुलाखत कक्ष या सर्व ठिकाणी खटके उडत होते.

शुक्रवारी दोन अंडी व पाच पावांचा हिशोब न लागणे हे मंजुळाला झालेली अमानुष मारहाण व लैंगिक छळाचे केवळ निमित्त होते. आधीपासूनच कारागृह अधिकारी विशेषत: महिला जेलर मनीषा पोखरकर व पाच महिला गार्ड यांच्या मनात मंजुळाबाबत खदखद होतीच.

मंजुळाला वेळीच धडा शिकवला नाही तर कैद्यांच्या मनात आपला धाक राहणार नाही, अशी भीती या सहा जणींच्या मनात होती, अशीही माहिती कारागृह प्रशासन व नागपाडा पोलिसांनी केलेल्या चौकशीतून पुढे आली आहे.

महिला आयोगाकडून दखल

  • अतिरिक्त पोलीस महासंचालकांना समन्स

भायखळा कारागृहात वॉर्डन मंजुळा शेटय़े हत्याकांडाची दखल घेत राज्य महिला आयोगाने स्वाधिकारात याचिका दाखल करून घेत अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृहे) भूषण कुमार उपाध्याय यांना समन्स जारी केले आहे. २९ जून रोजी आयोगासमोर हजर राहून या संपूर्ण प्रकरणाची माहिती व केलेली कारवाई याचा अहवाल सादर करा, अशा सूचना उपाध्याय यांना आयोगाने केल्या आहेत.

उपाध्याय यांना २९ जून रोजी आयोगासमोर हजर राहाण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच घडलेली घटना, घटनाक्रम, त्यावर केलेली कारवाई याचा अहवाल सादर करण्यासही सांगण्यात आले आहे. त्याच दिवशी आयोगाचे पदाधिकारी भायखळा कारागृहालाही भेट देणार आहेत, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले.

राज्य मानवी हक्क आयोगानेही मंगळवारी सकाळी कारागृह प्रशासनाला नोटीस जारी केली. याबाबत कारागृहाचे महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांना विचारले असता कारागृहात एखाद्याचा अकस्मात मृत्यू घडतो तेव्हा मानवी हक्क आयोगाला कळवले जाते. हा नियम आहे. मात्र अद्याप मानवी हक्क आयोगाची नोटीस या कार्यालयाला मिळालेली नाही.