भायखळा तुरुंगात पोलिसांच्या मारहाणीत मंजुळा शेट्येचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोषी असलेल्या ६ पोलिसांना न्यायालयात हजर करण्यात आलं, यावेळी मृत मंजुळाच्या अंगावर असलेल्या खुणा मारहाणीमुळे नाही तर बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यामुळे झाल्या आहेत असा अजब दावा पोलिसांनी कोर्टात केला. याप्रकरणी चक्रावून गेलेल्या कोर्टानं इतर दोषींना वाचविण्यासाठीही तुम्ही असाच प्रयत्न करता त्यांना अशीच साथ देता का? असा प्रश्न पोलिसांना केला आहे.

२३ जून २०१७ रोजी मंजुळा शेट्येला भायखळा तुरुंगात पोलिसांनी जबरदस्त मारहाण केली होती. २ अंडी आणि ५ पाव यांचा हिशोब कैद्यांची महिला वॉर्डन असलेल्या मंजुळाकडून लागत नव्हता म्हणून सहा पोलिसांनी तिला बेदम मारहाण केली. ज्यानंतर तिला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.. मात्र २४ जून २०१७ रोजी तिचा मृत्यू झाला होता. तुरुंग अधिकारी मनिष पोखरकर, तुरुंग रक्षक बिंदू नाईकोडी, वसिमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या सगळ्यांना मंजुळाच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खटला सुरू आहे.

या सगळ्या दोषींना न्यायालयानं १४ दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली होती. आता न्यायालयात आज कोर्टासमोर पोलिसांनी साक्ष देताना मंजुळाच्या अंगावर झालेल्या जखमा या मारहाणीमुळे नाही तर बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यानं झाल्या होत्या असा अजब दावा केला आहे. खरंतर याप्रकरणात २९२ महिला कैद्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत.

ज्यापैकी ६० कैद्यांनी मंजुळा शेट्येला मारहाण करणारे सहाजण कोण पोलीस होते हे बरोबर ओळखलं आहे. अशातही पोलिस मात्र मंजुळाच्या अंगावर जखमांच्या खुणा या माराहाणीच्या नाही तर पडल्यामुळे झाल्या असल्याचा दावा करत आहेत. पोलिसांचा दावा एखाद्या हिंदी सिनेमाच्या मसालापटाला लाजवेल असाच आहे. आता या प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरू आहे, या पोलिासांना काय शिक्षा होणार हे पाहाणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

 

काय आहे नेमके प्रकरण?
मंजुळा शेट्ये या महिला कैद्याचा २४ जून २०१७ रोजी  मृत्यू झाला. हा मृत्यू तुरूंग अधिकाऱ्यांच्या मारहाणीत झाल्याची माहिती समोर

मंजुळा शेट्येच्या मृत्यूपूर्वी तिला नग्न करून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचाही आरोप

मंजुळाकडून दोन अंडी पाच पाव याचा हिशेब लागत नव्हता म्हणून ही अमानुष मारहाण करण्यात आली. एका बॅरेकमध्ये तिला निर्वस्त्र करून मारण्यात आले असा आरोप इंद्राणी मुखर्जीने केला आहे

इंद्राणी मुखर्जी आणि इतर महिला कैद्यांनी मंजुळावर तुरूंग अधिकाऱ्यांनी अमानुष लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

या सगळ्या प्रकरणानंतर नागपाडा पोलिसांनी इतर महिला कैद्यांना बोलते केले, त्यांनी हा अत्याचार घडल्याची माहिती दिली आहे.