मानखुर्दमधील घटना; घरी परतताना आईचा हात सुटला अन्..

घरी परतताना आईचा हात सुटून गर्दीत हरवलेल्या चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार मानखुर्द येथे उघडकीस आला आहे. मानखुर्द पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून गुन्हे शाखाही या नराधमाचा शोध घेत आहे. गेल्या काही दिवसांत पूर्व उपनगरात महिला आणि खास करून अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात वाढ झाली असून गुन्ह्य़ांचा छडा लागत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मानखुर्दच्या मंडाळा परिसरातील आरबीटी वसाहतीच्या मागे झुडपामध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती मानखुर्द पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

मुलीच्या तोंडात कापड कोंबण्यात आले होते, तर शरीरावर रक्ताच्या खुणाही होत्या. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविला असता, या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. आदल्या रात्री, म्हणजे रविवारी मध्यरात्री मानखुर्द पोलीस स्टेशनमध्ये आपली चार वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार एका महिलेने केली होती. महिलेला या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी बोलावले असता, ही तिचीच मुलगी असल्याचे स्पष्ट झाले.

उत्तर प्रदेशातून आलेले हे कुटुंबीय मानखुर्द रेल्वे स्टेशनसमोरील मोकळ्या जागेत चणे-फुटाणे विकतात. मृत मुलीचे वडील मनोरुग्ण असून तिची आई आणि मोठी बहीण असा परिवार आहे. रविवारी रात्री व्यवसाय आवरून आई आपल्या दोन्ही मुलींसह घरी जात असताना गर्दीत चार वर्षांच्या या मुलीचा हात सुटला. खूप वेळ शोध घेऊनही मुलगी सापडत नसल्याने आईने अखेर मानखुर्द पोलीस ठाणे गाठले. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तक्रार नोंदविल्यानंतर मानखुर्द पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर, सोमवारी सकाळी सापडलेली मुलगी तीच असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांविषयी कमालीची नाराजी

फेब्रुवारी १६ तारखेला शिवाजीनगर परिसरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून धारावीच्या टी-जंक्शन येथे सापडली होती. तिच्यावर अत्याचार करणारा नराधम अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. तर, काही महिन्यांपूर्वी गोवंडीच्या इंडियन ऑइलनगर परिसरात गटारात हात तोडलेल्या एका महिलेचा मृतदेह सापडला होता. तिच्या मारेकऱ्यांची ओळखही अजून पोलिसांना पटवता आलेली नाही. या दोन्ही गुन्ह्य़ांचा तपास पोलीस ठाण्याबरोबरच गुन्हे शाखेचा कक्ष ६ ही करत असून त्यांनाही काहीच यश मिळालेले नाही. नागरिकांमध्ये कमालीची नाराजी आहे.

चुलत बहीण बेपत्ताच

मृत मुलीच्या मानखुर्द परिसरात राहणाऱ्या चुलत बहिणीचे जुलै २०१५ मध्ये अपहरण झाले होते. याची तक्रारही मानखुर्द पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. मात्र, तिचा शोध घेण्यात पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखेलाही अपयश आले आहे.